Wed, Apr 01, 2020 00:35होमपेज › Sangli › छप्पराला आगीत वृद्ध होरपळून ठार

छप्पराला आगीत वृद्ध होरपळून ठार

Last Updated: Jan 22 2020 2:17AM
जत : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील दरीबडची  येथे चुलीतील विस्तवाच्या ठिणगीने छप्पराला आग  लागली. त्या आगीत हणमंत गुरबाळा माळी (वय 65) यांचा होरपळून मृत्यू झाला. माळी यांच्या पत्नी सखुबाई जखमी झाल्या. मंगळवारी दुपारी ही दुर्घटना झाली. माळी आणि त्यांची पत्नी दोघेही अर्धांगवायूने आजारी होते.दरीबडची येथील  माळी वस्तीवर हणमंत माळी  मळ्यात छप्परात राहतात. दोघांनाही अर्धांगवायू झालेला आहे. त्यांचे दोन्ही मुलगे जत येथे राहतात. त्यामुळे मळ्यातील छप्परात माळी व सखुबाई असे दोघेच होते. 

छप्परातील  चुलीत  अर्धवट विझलेला विस्तव होता. त्यातील ठिणगी वार्‍याने उडून छप्पराला आग लागली. शेजारचे शेतात कामाला गेल्यामुळे कुणालाच आग विझवायला लवकर येता आले नाही. सखुबाई या छप्परालगत बाहेर बसलेल्या होत्या. त्यांना आजारामुळे चालता- बोलता येत नाही. आगीचे चटके बसल्यानंतर  त्या जोराने ओरडल्या. त्यामुळे  शेजारी शेतात काम करणारे शेतकरी देवाप्पा मासाळ  धावत आले. त्यांनी धाडसाने  सखुबाई माळी यांना उचलून नेऊन बाजूला ठेवले. त्यामुळे त्या वाचल्या. त्यांचा हात मात्र भाजला.

मात्र छपरात असलेल्या हणमंत यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ते आगीतून बाहेर पडू शकले नाहीत. रोख 25 हजार रुपये, एक तोळा सोने,संसारोपयोगी साहित्य आणि धान्य  आगीत जळून खाक झाले. एक लाख दहा हजार रुपयांचे नुकसान झाले .  छप्पर पाल्यापाचोळ्याचे असल्याने आगीने चटकन रौद्ररुप धारण केले. शेजारील लोक आग विझविण्यासाठी आले.परंतु आग भडकल्याने ती  आटोक्यात आली नाही.सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद कांबळे तपास करीत आहेत.

आवाज काळीज पिळवटून टाकणारा

छप्पराला आग लागल्यानंतर चटके बसायला लागले. त्यामुळे  हणमंत माळी ओरडत होते. विव्हळत होते.  त्यांचा आवाज हृदय पिळवटून टाकणारा होता. आगीने छपराला चोहोबाजूंनी घेरलेले होते. त्यामुळे  सगळे छप्पर आगीने ढासळून पडले.परिणामी कोणालाही मदत करता आली नाही.

तीन दिवसांतील दुसरी घटना 

दरीबडची येथील मासाळवस्तीवरील बिराप्पा तुकाराम मासाळ यांच्या झोपडीला आग लागून 5 लाख 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.रविवारी ती  घटना घडली होती. आज पुन्हा माळी यांच्या छपराला आग लागली.