Wed, Aug 12, 2020 09:17होमपेज › Sangli › जत तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ‘सर्जरी’ची गरज

जत तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ‘सर्जरी’ची गरज

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 9:10PMयेळवी : विजय रुपनूर

विस्ताराने मोठ्या असलेल्या जत तालुक्यात सरकारी रुग्ण सेवा रामभरोसे आहे. मोठ्या प्रमाणात रिक्त पदे, वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष यामुळे सामान्य जनतेचे हाल सुरू आहेत. बाळंतपणाच्या रुग्णांना योग्य ट्रिटमेंट दिली जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. लोकप्रतिनिधीही या महत्वाच्या व्यवस्थेकडे कानाडोळा करीत असल्याने जनतेला जादा किंमत मोजून खासगी रुग्णालयांचा आसरा घ्यावा लागत आहे.

तालुक्यात माडग्याळ व जत अशी दोन ग्रामीण रुग्णालये आहेत. लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे आणखी एका ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकता आहे. येळवी, शेगाव, वळसंग, डफळापूर, संख, बिळूर, कोंत्यावबोबलाद, उमदी अशी आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. मुचंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मंजूर होता. तथापि इमारतीसाठी जागा मिळाली नसल्याचे कारण दाखवत हे केंद्र जाडरबोबलादला नेण्याच्या हालचाली सुरू होत्या. परंतु याला येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. यामुळे हे केंद्राचे भिजत घोंगडे आहे.

सध्या तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येळवी, आंवढी, बनाळी, सनमडी, सोन्याळ, सोरडी, जत 1 ते 4 निगडी, वळसंग, बाज, जिरग्याळ, कंठी, अंकले, संख, अंकलगी, दरीबडची, मुचंडी, आसंगी तुर्क, बिळूर, उमराणी, मेंढीगिरी, बसर्गी, कोंत्यावबोबलाद, गिरगाव, बोर्गी-2, करजगी, तिकोंडी, उमदी , बालगाव , सुसलाद , बेळोंडगी, उटगी अशी 42 उपकेंद्रे आहेत. पण ही संख्याही अपुरी आहे. रुग्णांना सोयीसुविधा वेळेत मिळाव्यात म्हणून गुळवंची, आसंगी, जत, देवनाळ, बिरनाळ, रामपूर, मिरवाड, शिंगणापूर, कुडणूर, येळदरी, गुगवाड, जालीहाळ खुर्द या 12 गावात प्रस्तावित उपकेंद्र मंजूर करण्यात आली आहे. 

तालुक्यात आरोग्य विभागावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो. पण गरजूंना त्या वेळेत मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ, पेटावायलट, टीटी, पोस्टर टीटी, बीसीजी,गोवर, धनुर्वात, रेबीज व प्रतिसर्प विष व श्वानदंशावरील अशा लसी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहेत. पण यातील बहुतांश ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वेळेत हजर नसतात. अनेक ठिकाणी रुग्णांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. येळवी प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी वैद्यकीय अधिकारी उपस्थितीत नसल्याची रुग्णांची सततची तक्रार आहे. त्यामुळे रुग्णांची अनेकवेळा गैरसोय होते. यापूर्वी  या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचा हलगर्जीपणा दिसून आला होता. तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रात रिक्तपदे मोठ्या प्रमाणात आहेत.

 204 पैकी 70 जागा रिक्त आहेत. आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी एकही नाही. वैद्यकीय अधिकारी यांच्या 7 जागा मोकळ्या आहेत. आरोग्य सहाय्यक पुरूष व स्त्री यांच्या प्रत्येकी 4 जागा रिक्त आहेत. आरोग्य सेवक पुरुष या 12 जागा गेल्या अनेक वर्षांपासून भरलेल्या नाहीत. आरोग्य सेवक स्त्री या जागांवर तालुक्यात येण्यास अनेकजण अनुत्सुक असतात त्यामुळे 14 ठिकाणी या जागा मोकळ्या आहेत. औषध निर्मात्याच्या 3, कनिष्ठ लिपिकची 1, वाहन चालकाच्या 4, शिपाई पदाच्या  15, स्वच्छक 5 रिक्त  अशा एकूण  70 जागा रिक्त आहेत. तालुका लांब व दुर्गम असल्याने याठिकाणी येण्यास कोणीच धजावत नाही. याचा ताण यंत्रणेवर पडत आहे. परिणामी आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.

ऑपरेशन आरोग्य सेवेचे

शिराळा, जत, कवठेमहांकाळ या तालुक्यात पुरेशी आरोग्य यंत्रणा आहे. पण तिची अंमलबजावणी नीट होताना दिसत नाही. काही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांची कमतरता आहे. हे तालुके दुष्काळी असल्याने येथे बदली करुन जाण्यास कोणीच इच्छुक दिसत नाही. झालेली बदली रद्द करण्यासाठी खटाटोप केला जातो. बदली झालीच तर अनेकजण काम करीत नसल्याचे चित्र आहे. परिणामी रुग्णांना खासगी डॉक्टरांवर अवलंबून रहावे लागते. या तीनही तालुक्यातील आरोग्य सेवेचे केलेले हे ऑपरेशन....

खासगीत लूट

सरकारी दवाखान्यांत रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने अनेकजण खासगी हॉस्पिटलकडे जातात. या ठिकाणी लूट केली जात आहे. सीमावर्ती भागातील लोक कर्नाटक राज्यातील विजापूर येथे मोठ्या प्रमाणात जातात. काही गावात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पाहावयास मिळतो. त्यांच्यावर आरोग्य यंत्रणा कारवाई करीत नाही.