Wed, Aug 12, 2020 09:12होमपेज › Sangli › भाजप महायुतीचा प्रभाव निर्विवाद सिद्ध

भाजप महायुतीचा प्रभाव निर्विवाद सिद्ध

Published On: May 26 2019 1:46AM | Last Updated: May 25 2019 10:17PM
कवठेमहांकाळ : गोपाळ पाटील

खासदार संजय पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्याशी पैरा केला. पाटील यांना जीवाभावाने मदत केल्याची परतफेड विधानसभेच्या रिंगणात करण्याचा दिलेला शब्द खासदार पाटील यांना आता पाळावा लागणार आहे. तशी अपेक्षा घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. 

विरोधकांतील गैरमेळ, जातीच्या समीकरणात विभागलेला मतदार, खासदार पाटील यांचे होमपीच याचा भाजपला मोठा फायदा झाला. त्याचवेळी तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात लोकसभेला मिळालेल्या मतधिक्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 2014 ची  पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

होमपीचचा फायदा

खासदार पाटील यांना दुसर्‍यांदा विजयी करण्यात हा विधानसभा मतदारसंघ महत्त्वाची भूमिका बजावेल,  अशी शक्यता सुरुवातीपासून व्यक्त केली जात होती. तासगाव तालुका हा खासदार पाटील यांचे घरचे मैदान.गेल्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यासही कधी परके मानले नाही. दोन्ही तालुके आपलेच असल्याचे सांगत त्यांनी विकासाची गंगा वाहती ठेवण्याचा प्रयत्न केला.  पाणी योजनांमध्ये त्यांनी विशेष लक्ष घातले. त्याचा फायदा या निवडणुकीत झाला.

खासदार पाटील यांनी गेल्या पाच वर्षांतत प्रत्येक गावास दिलेल्या भेटी आणि जिव्हाळ्याचे संबंध या निवडणुकीत कामी आले. त्यामुळे खासदार पाटील यांना सलग दुसर्‍यांदा विजय नोंदवता आला. 

गेल्या निवडणुकीत तत्कालीन गृहमंत्री (स्व.) आर. आर. पाटील यांनी संजय पाटील यांना मोठा विरोध केला होता. मात्र तरीही लोकांनी संजय पाटील यांना साथ दिली होती. तासगाव तालुक्याने आमचाच खासदार हा चंग बांधून काम केले. यावेळीही पक्षभेदाकडे कानाडोळा करीत लोकांनी त्यांना मदत केल्याचे दिसून आले.

घोरपडे यांची मोलाची मदत

घोरपडे आणि संजय पाटील यांच्यात चार वर्षांच्या काळात राजकीय वितुष्ट आले होते.  

एकमेकांच्या विरोधात वक्तव्ये केली. मात्र या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने घोरपडे यांनी संजय पाटील यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. घोरपडे यांनी प्रामाणिकपणे मदत केली. स्वत: प्रचार केला. खासदार पाटील यांच्यापेक्षा आक्रमकपणे त्यांनी तालुक्यातील प्रचाराची यंत्रणा राबविली. 

कार्यकर्त्यांची फळी

खासदार पाटील यांनी गेल्या पाच वर्षांच्या काळात कोणताही मध्यस्थ न ठेवता थेट लोकांशी संपर्क ठेवला. त्याचवेळी कार्यकर्त्यांची अभेद्य फळी उभी करण्यात यश मिळविले. त्याचा त्यांना या निवडणुकीत फायदा झाला. तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन्ही तालुक्यात त्यांना थेट मानणारे कार्यकर्ते असल्यामुळे प्रचार अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात यश मिळाले. 

तासगावची भूमिका निर्णायक

लोकसभा निवडणुकीचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे. मागील निवडणुकीत ‘आमचाच खासदार आणि आमचाच आमदार’ ही संकल्पना तासगाव तालुक्यात राबली. त्याचा फटका घोरपडे यांना बसला. त्यावेळी आर. आर.  पाटील  नेतृत्व करीत होते. आता सुमनताई पाटील आणि घोरपडे यांच्यात लढत होणार आहे. तासगाव तालुका कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष राहणार आहे. 

पडळकर काय करणार?

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनाही मतदारसंघाने साथ दिली. विशेषतः धनगर आणि दलित समाजातील लोकांनी  साथ दिली. खासदार पाटील यांना विरोध ही प्रमुख भूमिका पडळकर यांची राहिली. आगामी विधानसभा निवडणुकीत पडळकर कोणती भूमिका घेणार, हा आता औत्सुक्याचा विषय राहणार आहे.

राष्ट्रवादी, काँगे्रस निष्प्रभ

दोन्ही  तालुक्यात आमदार सुमन पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस निष्प्रभ ठरली.  राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते भाजपचा प्रचार करीत असल्याचे दिसत होते. राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्ते यापूर्वीच खासदार पाटील यांच्याशी संधान बांधून होते. काँग्रेसकडे मतदारसंघामध्ये ना नेतृत्व ना कार्यकर्ते अशी स्थिती आहे. त्यामुळे प्रभावशून्य राहिलेल्या विरोधकांना मते मिळणार कशी, हा प्रश्‍न होता. विधानसभा निवडणूक लढवण्याच्यादृष्टीने अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये सुधारणा होत नसल्याचे चित्र दिसत आहे.