Mon, Jan 25, 2021 15:38होमपेज › Sangli › पाऊस थांबला; चांदोली धरणाचे दरवाजे बंद

पाऊस थांबला; चांदोली धरणाचे दरवाजे बंद

Published On: Aug 13 2019 5:42PM | Last Updated: Aug 13 2019 5:42PM
शिराळा : प्रतिनिधी

शिराळा तालुक्यात पाऊस थांबला असून, चांदोली धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. साडंव्यातून विसर्ग थांबला आहे. वारणा व मोरणा नदीस आलेला पूर आता ओसरू लागला आहे. चांदोली धरणाचे दरवाजे उघडल्‍याने नदी काठची शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली होती. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात वारणा नदीवरील काखे मांगले व मांगले सार्वर्डे पूल अद्याप पाण्याखाली गेले आहेत. 

शिराळा तालुक्यात पावसाने पूर्ण उघडीप दिली असून, जनजीवन सुरळीत सुरू झाले आहे. वारणा नदीवरील आरळा, चरण, बिळाशी पूल वाहतुकीस खुले झाले आहेत. गेली आठ दिवस या मार्गावर वाहतूक बंद झाली होती. तालुक्यात  वारणा मोरणा नदीस आलेला महापूर हळूहळू ओसरला आहे. चांदोली धरणाच्या वीज निर्मितीमधून ६१८ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. 

वारणा नदीचे पाणी नदीकाठच्या २० गावांत शिरले होते. त्या ठिकाणच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. आरळा, काळुंद्रे, सोनवडे येथे वारणा नदीचे पाणी घरात व दुकानात शिरले होते. ते आता कमी झाले आहे. नागरिकांनी साफसफाईची कामे सुरू केली आहेत. दुकानातील मालांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर बाधित कुटुंबांना वीस किलो धान्य शासनाकडून देण्यात आले आहे. तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मदत येऊ लागली आहे. 

नदी काठची शेकडो एकर शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. त्‍यामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिले आहेत. चांदोली धरण परिसरात दहा दिवस सतत अतिवृष्टी सुरू होती. आता पाऊस बंद आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे पूर परिस्थिती ओसरू लागली आहे. 

शिराळा तालुक्यातील २० गावातील ६०५ कुटुंबाचे, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले होते. पूर कमी झाल्याने काही कुटुंबे आपल्‍या घरी परतू लागली आहेत. पुरामुळे ३४२ घरांची पडझड झाली आहे. तालुक्यातील कोकरूड मलकापूर, आरळा शित्तुर, चरण सोंडोली, बिळाशी, सागांव भेडसगांव पूलावरून वाहतूक सुरू झाली आहे.

पूलावरील पाणी कमी झाले असल्याने शिराळा आगाराने एसटी बस सुरु ठेवल्या आहेत. मंगळवार पासून प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय  नियमित सुरू झाली आहेत. 

पुरामुळे पडलेल्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पुरामुळे तालुक्यात पश्चिम भागात विद्युत पुरवठा खंडित झालेल्या ठिकाणी सुरू करण्याचे काम सुरू झाले आहे. मोबाईल टॉवर बंद होते ते सुरू करण्याचे काम चालू आहे.