Wed, Aug 12, 2020 08:23होमपेज › Sangli › खंडणीखोरांना चुनचुनके धडा शिकवा

खंडणीखोरांना चुनचुनके धडा शिकवा

Last Updated: Jul 01 2020 10:14PM

संग्रहित छायाचित्रचिंतामणी सहस्रबुद्धे

सांगली जिल्ह्यासाठी खंडणीविरोधी पोलिस पथक तयार करायचा जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी  घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय असा आहे.  कारण खंडणीविरोधी पथक स्थापन होत आहे, अशी  नुसती बातमी आज प्रसिद्ध झाल्यावरच त्या क्षेत्रात वावरत असलेल्या अनेकांना हादरा बसला आहे. 

खंडणी वसूल करून त्यावर आपला चरितार्थ चालवणं हा अलिकडं अनेकांचा रीतसर व्यवसाय बनला आहे. गेल्या काही वर्षांत  काहींनी या व्यवसायात  पद्धतशीरपणे जम बसवला आहे. त्यामुळं ते ज्यांच्याकडून ही खंडणी वसूल करतात त्यांच्यापेक्षा काही खंडणीबहाद्दर अधिक श्रीमंत झाले आहेत, असं दिसून येतं. कोणताही रूढ व्यवसाय करीत नसतानाही त्यांचे बंगले आणि अलिशान गाड्या पाहिल्या तर धक्का बसेल, अशी स्थिती आहे.

सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे यापैकी काही खंडणीबहाद्दर हे सामाजिक कार्याचा बुरखा पांघरून राजरोसपणे समाजात वावरत असतात. पोलिस ठाणं, सरकारी कार्यालयं   किंवा महापालिकेतल्या बैठकांना त्यापैकी अनेकजण  उपस्थित राहतात. प्रशासनालाही अनेकदा प्रश्न विचारून भंडावून सोडतात. त्यांच्या या कारनाम्यांमुळं प्रामुख्यानं काही डॉक्टर, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी आणि शासकीय अधिकारी तसंच कर्मचारीही त्रस्त झाले आहेत.  

राज्य शासनानं बुवाबाजी थांबवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. मात्र समाजसेवेच्या नावाखाली विविध कायद्यांचा धाक दाखवून किंवा तक्रारी करण्याची धमकी देऊन पैसे उकळणार्‍या अशा अनेक बुवा आणि बाबांनाही आता कडक कायद्याचा चाप लावण्याची गरज आहे. 

अर्थात सगळेच सामाजिक कार्यकर्ते किंवा माहिती अधिकाराच्या क्षेत्रात काम करणारे असले उद्योग करतात असे नाही. मात्र काही महाभाग सामाजिक कार्याच्या क्षेत्राला त्यांच्या उपद्व्यापांमुळं बदनाम करीत आहेत. त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे.

यापैकी अनेक खंडणीबहाद्दरांनी काही राजकीय पक्षांचाही आश्रय घेतला आहे, असं दिसून येतं. ज्यांना कोणत्याच पक्षात थारा मिळालेला नाही  त्यांनी स्वतःच  वेगवेगळ्या संस्था किंवा संघटना स्थापन केल्या आहेत. त्या संस्था किंवा संघटनांची लेटरहेड छापून घेऊन त्यावर पदाधिकारी म्हणून स्वतःची नावं काहीजण मिरवत आहेत. 

कोणताही कायदा हा पूर्ण विचाराअंती, सगळ्या साधकबाधक बाजूंचा विचार करून आणि  सद्हेतूनंच केलेला असतो. मात्र अशा काही कायद्यांचा  डॉक्टर, वरिष्ठ अधिकारी किंवा व्यावसायिक यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी काहीजण वापर करीत आहेत.  

सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा, त्यांचे प्रश्न सहजासहजी सुटावेत, शासनाचा कारभार पारदर्शी व्हावा, या उदात्त उद्देशानं माहितीचा अधिकार हा कायदा करण्यात आला आहे. त्या कायद्यामुळं अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत. अनेक प्रकल्पाची रखडलेली कामं गतिमान झाली आहेत. सरकारी कारभारात गडबड करणार्‍यांना काही प्रमाणात तरी लगाम बसला आहे, ते विसरता येणार नाही. मात्र याच कायद्याचा वापर स्वतःच्या लाभासाठी करण्याचा प्रयत्न करणारेही  गेल्या काही वर्षांत वाढले आहेत. 

प्रदूषण नियंत्रण कायदा, भेसळ प्रतिबंधक कायदा, वजन मापे नियंत्रण कायदा याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रासाठीही अनेक कायदे चांगल्या उद्देशानं तयार केले आहेत. मात्र त्यांचा दुरुपयोग करणार्‍यांचीही संख्या भरपूर आहे. अनेकदा अशा प्रत्येक कायद्याचा वापर करून किंवा धाक दाखवून स्वतःचे खिसे भरणार्‍यांची संख्याही वाढते आहे.  

अनेक डॉक्टर, व्यावसायिक किंवा अधिकारी त्यांचं काम प्रामाणिकपणे करीत असतात. अनेकदा नजरचुकीनं एखादी चूक त्यांच्या हातून होऊ शकते. अशांना हे खंडणीबहाद्दर अचूक हेरतात आणि अवघड जागी पकडतात. अनेकदा  प्रामाणिक अशा एखाद्या डॉक्टर किंवा व्यावसायिकावर कुभांडही रचलं जातं. डॉक्टर आणि रुग्ण यांचा रोजचा संपर्क आणि संबंध असतो. त्यामध्ये छोटीशी फट सापडली तरी,  त्या डॉक्टरला हैराण केलं जातं. त्यामुळं  तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत त्या डॉक्टरला  शरणागती पत्करावी लागते. 

त्यानंतर मग अशा प्रसंगातून मधला मार्ग काढण्यासाठी अपेक्षेप्रमाणं हालचाली सुरू होतात.  काही मध्यस्थही पुढं येतात.  तक्रारी, दिखाऊ आंदोलन, वाटाघाटी किंवा तडजोड अशा सगळ्या पातळ्यांवर काम करणारी टोळीच काही ठिकाणी तयार झाल्याचं सांगितलं जातं. 

काहीजणांचे सगळेच व्यवहार सफेद नसतात. काहीतरी गडबड असतेच. असे लोक  आणि या टोळ्या यांचे संबंध सौहार्दपूर्ण तसंच देवाण-घेवाणीचे असतात. त्यासाठी ठराविक ‘प्रोटेक्शन मनी’ ठरवला जातो. मात्र अनेकदा कोणतीही चूक नसतानाही अनेकजण या सगळ्या प्रकाराला आणि मुख्य म्हणजे अब्रूला  घाबरतात.  ‘दुर्जनं प्रथमं वंदे, सज्जनं तद्नंतर’ असं म्हणत ते  या मंडळीचं म्हणणं मान्य करतात.

मारिओ पुझो या लेखकाची ‘गॉड फादर’ ही इंग्रजी कादंबरी सत्तरच्या दशकात गाजली होती. त्या कादंबरीवर त्याच नावानं निघालेला चित्रपटही जगभर  कोट्यवधी प्रेक्षकांनी पाहिला होता.  ‘प्रोटेक्शन मनी’ ही संकल्पना  सर्वप्रथम या कादंबरीमुळं जगभर माहीत झाली. विविध क्षेत्रातल्या प्रथितयश व्यावसायिकांकडून  त्यांचे व्यवसाय सुरक्षित ठेवण्यासाठी ‘प्रोटेक्शन मनी’ गोळा केला जात असे, असं या कादंबरीत दाखवलं आहे.  अ‍ॅलिस्टर मॅकलिन याची ‘फिअर इज द की’  आणि  त्याच काळात जेम्स हॅडले चेस याचीही याच स्वरुपाची कादंबरीही वाचकांची पसंती मिळवत होती. ‘भीती हीच पैसे मिळवण्याची गुरूकिल्ली आहे’, असं मॅकलिन आणि चेस यांच्या  कादंबर्‍यात दाखवलं आहे. आधुनिक खंडणीबहाद्दरांनी या कादंबर्‍या वाचल्या आहेत की नाहीत, ते सांगता येत नाही. मात्र त्यांनी ‘प्रोटेक्शन मनी’ आणि ‘फिअर इज द की’ या संकल्पना व्यवहारात बिनचूक अंमलात आणल्या आहेत, एवढं मात्र निश्चित!

वेंकटाचलम यांची आठवण यावी

सांगलीत पूर्वी तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक वेंकटाचलम यांची कारकीर्द तुफान गाजली होती. त्यांनी  अवैध धंदे करणारे, खंडणीखोर, काळाबाजार करणारे आणि गुंड यांना जबरदस्त धाक बसवला होता. पोलिस अधीक्षक शर्मा यांनीही आता   या खंडणीखोरांना चांगला धडा शिकवावा, अशी लोकांची मागणी आहे. त्यामुळं  अनेकांची तथाकथित समाजसेवा बंद होईल. त्याचबरोबर त्यांच्या त्रासामुळं त्रस्त झालेल्या प्रामाणिक व्यावसायिकांनाही दिलासा मिळेल. 

नव्यांनाही क्षेत्राचे आकर्षण

अनेकांनी खंडणीच्या या व्यवसायात कोटकल्याण करून घेतल्याची उदाहरणं  ढळढळीतपणे समोर दिसतात. ती पाहून दररोज नवनवे होतकरू  उमेदवार या क्षेत्रात येण्याची धडपड करीत आहेत, असं दिसून येतं. काही  उमेदवारांनी दोन-तीन वर्षांच्या अनुभवानंतर या क्षेत्रात चांगलं बस्तान बसवल्याची अनेक उदाहरणं आहेत. विशेष म्हणजे या क्षेत्रातील जुने आणि नवे यांनी त्यांची ‘कार्यक्षेत्रं’ निश्चित केली आहेत. त्यामुळे सहसा त्यांच्यात संघर्ष होत नाही.