Wed, Feb 19, 2020 00:55होमपेज › Sangli › उमदी पोलिसांच्या ताब्यातून आरोपीचे बेड्यांसह पलायन

उमदी पोलिसांच्या ताब्यातून आरोपीचे बेड्यांसह पलायन

Last Updated: Feb 15 2020 12:55AM
जत : पुढारी वृत्तसेवा
जत उमदी या राज्यमार्गावर  शुक्रवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास उमदी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी  बेड्यांसह पळून गेला आहे. पोलिस त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. परंतु, तो सापडला नव्हता. त्याच्या तपासासाठी दोन पथके तयार करून शोधकार्य सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की,  मल्लिकार्जुन कांबळे (वय 22, रा. बोर्गी, ता. जत) हा तरुण एकतर्फी प्रेमातून एका तरुणीस घेऊन पळून गेला होता. याप्रकरणी त्याच्यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला रत्नागिरी येथून गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शुक्रवारी त्याला सांगली न्यायालयात नेण्यात आले. 

न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्यास उमदी पोलिस ठाण्यात नेत असताना रस्त्यात त्याने लघुशंका करायची आहे असे सांगितले. यावेळी पोलिसांच्या परवानगीने व्हसपेठ डोंगराजवळ लघुशंका करण्यास थांबल्यावर या आरोपीने तिथून पलायन केले.

आरोपी हातातील बेडीसह पसार झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस व ग्रामस्थ डोंगरात त्याचा  शोध घेत होते. या घटनेमुळे उमदी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे.