Sat, Oct 24, 2020 23:52होमपेज › Sangli › मदतीसाठी केंद्राचा पक्षपातीपणा

मदतीसाठी केंद्राचा पक्षपातीपणा

Last Updated: Oct 19 2020 1:22AM
सांगली : पुढारी वृत्तसेवा 

बिहारमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राने तातडीने एनडीआरएफचे पथक पाठविले. मात्र राज्यात ते अद्यापही आलेले नाही. केंद्र  सरकारकडून पक्षपातीपणा सुरू आहे, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार बैठकीत केला. केंद्राकडून 75 टक्के आणि राज्य शासनाकडून 25 टक्के अशी आर्थिक  मदत करावी, अन्यथा रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

ते म्हणाले, यावर्षी कधी नव्हे  असा चांगला पाऊस झाला.  पिके चांगली आली होती. मात्र  काढणीला पिके आल्यानंतर मुसळधार पाऊस पडला. अनेक भागात ढगफुटी झाली. भुईमूग, ज्वारी, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला शिवारात  कुजून  केला.  अतिवृष्टीने जिल्ह्यातील 15 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेली.

शेट्टी  म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ अशा 18 ते 20 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. त्यामुळे 50 हजार कोटीपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यातील 35 हजार कोटी केंद्र सरकारने द्यावेत. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निधीतून भरीव आर्थिक मदत द्यावी. नुकसानीची पाहणी करण्यासाठी एनडीआरएफचे पथक  पाठवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना   या मागणीचे पत्र पाठविले आहे. 

शेट्टी म्हणाले, राज्यात  गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरीव मदत करा, अशी मागणी करीत आहे. या मागणीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे.  भाजपच्या नेत्यांनी राज्य शासनावर अवलंबून न राहता केंद्राकडेही तशी मागणी करावी.

ते म्हणाले, राज्यभर नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत आहोत. दि. 24 ऑक्टोबरपर्यंत सर्व पाहणी पूर्ण होईल. त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवू.  रस्त्यांवर उतरुन तीव्र आंदोलन करू. जिल्हाध्यक्ष महेश खराडे, कार्यकर्ते उपस्थित होते. 

ठाकरे यांनी त्यांच्याच मागणीची पूर्तता करावी 

गेल्यावर्षी महापुरातील नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन केली होती. शेतकर्‍यांची अवस्था बघून त्यांनी विनाअट हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी केली होती. सुदैवाने आता ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आता त्यांनी त्यांच्याच मागणीची पूर्तता करावी, अशी मागणीही शेट्टी यांनी  केली. 

 "