Mon, Aug 10, 2020 04:52होमपेज › Sangli › नेते फोडण्यासाठी भाजपकडून ‘टॅक्स टेररिझम’ : चव्हाण

नेते फोडण्यासाठी भाजपकडून ‘टॅक्स टेररिझम’ : चव्हाण

Published On: Aug 03 2019 1:14AM | Last Updated: Aug 02 2019 11:12PM
सांगली : प्रतिनिधी 
नेत्यांची फोडाफोडी करण्यासाठी भाजपकडून ‘टॅक्स टेररिझम’  केले जात आहे. ईडी, आयकर, सीबीआय यांचा वापर करून ब्लॅकमेल केले जात आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केला. लोकांचा निवडणूक आयोग व प्रक्रियेवर विश्‍वास राहिलेला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन सार्वजनिक करावे; अन्यथा आगामी निवडणूक बॅलेट पेपरवरच घ्यावी, असेही ते म्हणाले.

काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा व शहर काँग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी चव्हाण बोलत होते. कार्यक्रमापूर्वी डॉ. कदम यांची युवक काँग्रेसतर्फे शहरात मिरवणूक काढण्यात आली. चव्हाण म्हणाले, भाजपमध्ये सध्या नेत्यांची मेगा भरती सुरू आहे. अनेकांना भाजपमध्ये घेऊन पवित्र केले जात आहे. त्यासाठी नेत्यांना कारवाईची भिती दाखविली जात आहे.  जे नाही म्हणतात, त्यांच्यावर हसन मुश्रीम यांच्याप्रमाणे कारवाई केली जात आहे. जनतेवर प्रचंड प्रमाणात कर लादला जात आहे. यातून आलेला पैसा नेत्यांना आमिष दाखविण्यासाठी वापरला जात आहे. 

ते म्हणाले, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 91 व्या घटना दुरुस्तीत पक्षांतर करणार्‍यांना मंत्री, आमदार होण्यास बंदी घातली आहे.  पण सध्या भाजपकडून त्याचे सरळसरळ उल्लंघन केले जात आहे. 

ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणूक निकालानंतर जनतेचा निवडणूक प्रक्रियेवर विश्‍वास राहिलेला नाही. सर्व पक्ष व जनतेचा ईव्हीएम मशीनला विरोध आहे. या मशीनमध्ये कोणते सॉफ्टवेअर, चीप, सर्किट वापरले जाते याची माहिती निवडणूक आयोग देत नाही. ही मशीन सार्वजनिक करण्याच्या मागणीकडे आयोग दुर्लक्ष करीत आहे.  आयोगाने मशीन सार्वजनिक करावे, अन्यथा निवडणूक बॅलेट पेपरवरच घ्यावी.

ते पुढे म्हणाले,  मॉब लिंचिग, धार्मिक धुव्रीकरण आणि न्यायव्यवस्थेचे खच्चीकरण केले जात आहे. भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ असलेला माहिती अधिकार कायदा मोडित काढला आहे.  उद्योग विश्‍वात मोठी मंदी आहे. त्यामुळे तरुण बेरोजगारीचा खाईत लोटला आहे.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीतील काँग्रेसच्या कारभाराचे खड्डे दाखवून आमदारकी व महापालिका जिंकली. पण आता कोणती परिस्थिती आहे? गुंठेवारी भाग नरकयातना भोगत आहे. सर्व शहर खड्ड्यात गेले आहे.  गाडगीळ यांनी पहिल्यांदा सांगली खड्डेमुक्त करावी, मग काँग्रेसमुक्तीची भाषा करावी. 

प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील, सत्यजीत देशमुख, जयश्री पाटील यांची भाषणे झाली. जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, जयकुमार गोरे, प्रकाश सातपुते, मंगेश चव्हाण, उत्तम साखळकर, महेंद्र लाड, विक्रम सावंत,  सुरेश मोहिते, प्रा. सिध्दार्थ जाधव, सिंकदर जमादार, राजाराम देशमुख, नामदेवराव मोहिते, मालन मोहिते, सौरभ पाटील, नामदेव कस्तुरे, सुुधीर जाधव, ए.डी. पाटील, मनीषा रोटे, प्रतापराव साळुंखे , अजित ढोले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईव्हीएमवर शंका : विश्‍वजित कदम 

 विश्‍वजित कदम म्हणाले, भाजपकडून जनतेची घोर फसवणूक सुरू आहे.  व्यापारी, उद्योजक, तरुण या सरकारवर नाराज आहेत. प्रत्येक जाती-धर्मातील माणूस स्वत:ला असुरक्षित समजतो आहे. उन्‍नाव घटना तर अमानुषपणाचा कळस आहे. लोकशाही टिकेल की नाही, अशी परिस्थिती आहे. माझ्याबाबत सुरू असलेल्या चर्चा केवळ अफवा आहेत. मी खंबीर आहे, तुम्ही खंबीर राहा. लोकांना ईव्हीएम मशिनबाबत शंका आहे. याबाबत आता आंदोलन केले जाणार आहे; पण मी, सत्यजित व विशाल पाटील जिल्ह्यातील काँग्रेसला संजीवनी देऊ.