Tue, Aug 04, 2020 14:09होमपेज › Sangli › तासगाव कोरोनामुक्‍त; २५ बाधितांना डिस्चार्ज

तासगाव कोरोनामुक्‍त; २५ बाधितांना डिस्चार्ज

Last Updated: Jul 14 2020 4:55PM
तासगाव : पुढारी वृत्‍तेसवा 

तासगाव तालुक्यात १४ मे रोजी गव्हाण येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. तेव्हापासून ५ जुलै अखेर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या २५ वर गेली होती. परंतु, सर्व २५ बाधितांनी कोरोनावर मात केली. या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्‍यामुळे आता तालुका कोरोनामुक्त झाला आहे. 

तालुक्यातील बाहेरुन आलेल्या एकूण १७ हजार ५८६ व्यक्तिंपैकी १६ हजार २४३ जणांचा होम किंवा संस्था क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तर १ हजार ३४३ व्यक्ती अजूनही क्वारंटाईनमध्ये आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल सुर्यवंशी यांनी दिली आहे. 

तालुक्यातील ११ गावात मिळून एकूण २५ कोरोनाबाधित सापडले. हे सर्वजण गुजरात, मुंबई, ठाणे, पनवेल आणि दिल्ली येथून आलेले आहेत. प्रशासनाने उत्तम नियोजन करून रुग्ण सापडलेल्या गावात उपाययोजना केलेल्या आहेत. तहसिलदार कल्पना ढवळे यांनी कोरोनाबाधित सापडलेल्या गावामध्ये कंटेन्टमेंट आणि बफरझोनची अंमलबजावणी केली आहे.  

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी व मार्गदर्शन केले. पोलिस निरिक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी काटेकोरपणे बफर व कंटेन्टमेंट झोनची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यात यश आले आहे. 

तालुक्यातील कोरोनावर मात करणारे गावनिहाय रुग्ण : तासगाव (६), गव्हाण (३), वायफळे (३), कचरेवाडी (२), शिरगाव वि. (२), पेड (१), मांजर्डे (१), सावळज (३), वाघापूर (१), बोरगाव (२), अंजनी (१)