Sat, Sep 19, 2020 07:51होमपेज › Sangli › कामाची गती वाढवा; अन्यथा जिल्ह्याबाहेर बदली : पालकमंत्री

कामाची गती वाढवा; अन्यथा जिल्ह्याबाहेर बदली : पालकमंत्री

Last Updated: Jan 25 2020 11:29PM
सांगली ः पुढारी वृत्तसेवा 

लालफितीचा कारभार, प्रलंबित प्रश्‍न, विकास कामांवरील अल्प खर्च यावरून पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत  अधिकार्‍यांना धारेवर धरले. कामाची गती वाढवा; अन्यथा जिल्ह्याबाहेर पाठवू. जमत नसेल तर तसे सांगा, सन्मानाने सोयीच्या ठिकाणी बदली करू, असे सुनावले. 

वीज कनेक्शन जोडणी, ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्यामुळे  महावितरणच्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पाटील यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री पाटील होते. कृषी व सहकार  राज्यमंत्री  डॉ. विश्‍वजित कदम, खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार मोहनराव कदम, अनिलराव बाबर, सुरेश खाडे, पृथ्वीराज देशमुख, सुमनताई पाटील, सुधीर गाडगीळ, मानसिंगराव नाईक, विक्रम सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्‍ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, महापालिका आयुक्‍त नितीन कापडनीस, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा नियोजन अधिकारी जे. डी. म्हेत्रे तसेच सदस्य व अधिकारी उपस्थित होते. 

प्रशासन सुरळीत चालले पाहिजे जिल्ह्यात प्रशासन गतीने व सुरळीत चालले पाहिजे. लोकांच्या हिताची कामे परिपूर्ण, नियमाने आणि गतीने झाली पाहिजेत. यामध्ये अडथळे आणणार्‍यांची गय केली जाणार नाही, असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला. जिल्हा वार्षिक योजनेतील कमी खर्चावरूनही त्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. कामात सुधारणा करा. मंदगतीने काम चालणार नाही. कामचुकारपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराच पाटील यांनी दिला. 

केवळ 600 शेतकर्‍यांना कनेक्शन

महावितरणने साडेचार हजार  शेती   विद्युत   पंपाच्या  जोडणीचे टेंडर भारत इलेक्ट्रीकल्सला दिले होते. या ठेकेदाराने एक वर्षाची मुदत संपल्यानंतरही केवळ 600 शेतकर्‍यांना वीजजोडणी दिली आहे.
 संबंधित ठेकेदार अनेक कामे घेतो, मात्र काम अत्यंत धिम्या गतीने करीत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. पृथ्वीराज देशमुख, विश्‍वजित कदम, अनिलराव बाबर यांनी ठेकेदाराच्या कामाबाबत तीव्र संताप व्यक्‍त केला. पालकमंत्री पाटील यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. 

कृषी - विमा कंपनीत संगनमत ?

पर्जन्यमापनाच्या नोंदीत खाडाखोड करून पाऊस कमी दाखविल्याकडे लक्ष वेधत आमदार बाबर यांनी संताप व्यक्‍त केला. कृषी विभाग आणि पीक विमा कंपनीत संगनमत आहे काय, असा सवाल त्यांनी विचारला. जाचक निकषांमुळे शेतकर्‍यांना फटका बसत असल्याकडेही लक्ष वेधले. 

सहा हजार शेतकर्‍यांना फटका 

आटपाडी तालुक्यात फळपीक विमा भरलेले शेतकरी 10 हजार 39 आहेत. अवकाळीने नुकसान झालेल्या 4 हजार 105 शेतकर्‍यांचे पंचनामे झाले आहेत. पीक विमा भरपाई मिळणार असल्याने उर्वरित 6 हजार शेतकर्‍यांच्या पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे, मात्र त्याचे पंचनामे झालेले नाहीत आणि जाचक अटींमुळे विमा भरपाईही मिळाली नाही. याचा फटका 6 हजार शेतकर्‍यांना बसला असल्याची तक्रार अरुण बालटे यांनी मांडली. दरम्यान, यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्या. 

दिव्यांग सर्टीफिकेटसाठी मिरज वैद्यकीय महाविद्यालयाकडे लाभार्थीला अनेक हेलपाटे मारावे लागतात याकडे विक्रम सावंत यांनी लक्ष वेधले. खासदार पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांची कानउघाडणी केली. उमदी पोलिस ठाण्याकडील फॅमिली क्वाटर्सच्या दुरुस्तीबाबत सरदार पाटील यांनी प्रश्‍न उपस्थित केला. जमीन सरहद्दी, शेतातील वाट, जमिनीच्या नोंदीचे प्रश्‍न तीन महिन्यात निकाली काढा. दर तीन महिन्यांनी या कामांच्या कार्यवाहीचा आढावा घ्या, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या. आमदार सावंत यांनी यासंदर्भात प्रश्‍न उपस्थित केला होता. 

जिल्हा नियोजन समिती सदस्य सुहास बाबर, शरद लाड, तम्मनगौडा रवि-पाटील, प्रमोद शेंडगे, अरूण बालटे, सरदार पाटील, स्नेहलता जाधव, सरिता कोरबू, आशा पाटील, जयश्री पाटील तसेच अन्य सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.

सुरेश खाडे - बाळासाहेब होनमोरे जुगलबंदी

आधारकार्ड काढण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला पुरेसा असताना आमदारांच्या शिफारशींची गरजच काय, असा प्रश्‍न सांगली जिल्हा बँकेचे संचालक  बाळासाहेब होनमोरे यांनी उपस्थित केला. त्यावर आमदार खाडे यांनी हस्तक्षेप केला. ‘तक्रार काय करताय, माझा तो अधिकार मी तुम्हालाच देतो’, असे खाडे म्हणाले.

 "