Wed, Aug 12, 2020 11:17होमपेज › Sangli › मताधिक्यासाठी ‘वाळवा-शिराळा’ टार्गेट

मताधिक्यासाठी ‘वाळवा-शिराळा’ टार्गेट

Published On: Apr 21 2019 1:42AM | Last Updated: Apr 20 2019 11:25PM
इस्लामपूर : मारुती पाटील

हातकणंगले मतदारसंघात निर्णायक  भूमिका  बजावणार्‍या  वाळवा व शिराळा विधानसभा मतदारसंघावर उमेदवारांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघातून जो उमेदवार आघाडी घेतो ती निर्णायक ठरते असा आजपर्यंतचा अनुभव आहे. म्हणून सुरुवातीपासूनच महाआघाडी-स्वाभिमानीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी व महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी दोन्ही मतदारसंघ पिंजून काढले आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांना खूपच धावपळ करावी लागली. हातकणंगले मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील चार आणि  सांगली जिल्ह्यातील वाळवा-शिराळा या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या सहा मतदारसंघांत 723 गावे आहेत. त्यामुळे  कमी कालावधीत प्रत्येक गावात प्रचाराच्या निमित्ताने पोहोचणे उमेदवारांना शक्य होत नाही. 

निवडणुकीचा प्रचार प्रारंभ झाल्यापासून  राजू शेट्टी व धैर्यशील माने वरील दोन विधानसभा मतदारसंघातच तळ ठोकून आहेत. सुरुवातीपासूनच दोघांनीही मताधिक्क्यासाठी हे दोन मतदारसंघच टार्गेट केले आहेत असे जाणवते. कोल्हापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत या दोन्ही उमेदवारांनी प्रचारासाठी सांगली जिल्ह्यातील या दोन मतदारसंघातच जास्त वेळ दिल्याचे दिसते. 

शिराळा मतदारसंघात 2 लाख 90 हजार 789 तर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात 2 लाख 68 हजार 83 असे एकूण साडेपाच लाखांवर मतदान आहे. त्यामुळे येथे जास्तीत जास्त आघाडी घेण्यासाठी दोन्ही उमेदवारांमध्ये  चुरस आहे. 

वाळवा मतदारसंघात काँगे्रस - राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार शेट्टी यांच्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यासह त्यांची यंत्रणा व  काँगे्रसच्याही पदाधिकार्‍यांनी  प्रचार यंत्रणा राबविली आहे.  शिवसेना - भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी  कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, पक्षप्रतोद विक्रम पाटील, गटनेते राहुल महाडिक, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, गौरव नायकवडी, वैभव शिंदे यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. 

शिराळा मतदारसंघात शेट्टी यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख मैदानात आहेत.  धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आमदार शिवाजीराव नाईक, सी. बी. पाटील, सम्राट महाडिक, अभिजित पाटील, जयराज पाटील आदी  नेते प्रचारात सक्रिय आहेत. 

एकूणच या निवडणुकीच्या निमित्ताने शिराळा - वाळवा तालुक्यातील  राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँगे्रस-राष्ट्रवादीप्रणित महाआघाडी विरुद्ध विकास आघाडी असा सामना या निवडणुकीत रंगला आहे. लोकसभेच्या निकालावर विधानसभेचे गणित ठरणार आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्यासाठीही ही निवडणूक महत्त्वाची आहे. आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी सर्वच राजकीय नेते जोमाने निवडणूक प्रचारात उतरले आहेत. यामध्ये कोण बाजी मारणार, याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

कोणती आघाडी मताधिक्क्य घेणार?

इस्लामपूर नगरपालिकेतील सत्तांतरानंतर वाळवा तालुक्यात  जयंत पाटील विरोधकांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. पालिका निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मात्र आघाडीत फूट पडली. तरीही जिल्हा परिषदेच्या 11 पैकी 4   आणि पंचायत समितीच्या 22 पैकी 7 जागा विकास आघाडीने जिंकल्या होत्या. त्यानंतरच्या ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांची ताकद वाढल्याचे दिसले. आता लोकसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी की विकास आघाडी मताधिक्क्य घेणार याबद्दल उत्सुकता आहे.