Wed, Feb 19, 2020 00:59



होमपेज › Sangli › सांगली तालुक्याबाबत लवकरच निर्णय घेऊ : महसूलमंत्री थोरात

सांगली तालुक्याबाबत लवकरच निर्णय घेऊ : महसूलमंत्री थोरात

Last Updated: Feb 15 2020 12:55AM




कडेगाव : पुढारी वृत्तसेवा
सांगली येथे स्वतंत्र तालुका व्हावा, अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. परंतु, त्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागतो.तेव्हा लवकरच सांगली तालुका निर्मितीसाठी धोरणात्मक निर्णय घेऊ, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम, काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

थोरात म्हणाले, सात-बारा ऑनलाईन करण्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्याचा शेतकर्‍यांना फायदाच होणार आहे.शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहे.हे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकर्‍यांना कोणत्याही  कामासाठी बँकेत किंवा शासकीय कार्यालयात सात बारा घेऊन फिरण्याची गरज लागणार नाही.शेतकर्‍यांचे ज्या कार्यालयात काम आहे ते  कार्यालय संबधित शेतकर्‍यांचा सातबारा ऑनलाईन उपलब्ध करून घेईल.याबाबतचा शासकीय निर्णय लवकरच निघेल.

ते म्हणाले, जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे महापूर,अवकाळी व अतिवृष्टीने कोट्यवधी रुपयांचे  मोठे नुकसान झाले आहे. महाविकास आघाडी सरकार याबाबत या सर्व  शेतकर्‍यांच्या पूर्ण पाठीशी आहे. सरकार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत करीत आहे. शेतकर्‍यांना मदत व नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्यामध्ये काही अडचणी होत्या.त्या सोडविण्यासाठी जिल्हा महसूल विभागाच्या अधिकार्‍यांचा सूचना दिल्या आहेत. 

थोरात म्हणाले,जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले क्षेत्र व शेतकर्‍यांना मदत मिळाली पाहिजे, यासाठी  डॉ. विश्वजित कदम  प्रयत्नशील आहेत.  याबाबत गाववर आढावा घेऊन मदतीपासून कोणी वंचित राहू नये. यासाठी दि. 18  फेब्रुवारीस जिल्हाधिकारी सांगली येथे बैठक घेतील. 

ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संपर्कमंत्री नेमले आहेत.जिल्ह्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासनाला विविध समित्या नेमाव्या लागतात.तेव्हा संपर्कमंत्री,जिल्हा समित्या आणि पालकमंत्री एकत्र बसून निर्णय घेतील. या व्यवस्थेची जिल्ह्यातील विविध समस्या सोडवण्यास चांगलीच मदत होईल.तसेच संपर्कमंत्री पदामुळे पक्ष वाढीसाठीही मोठी मदत होणार आहे.

महसूलच्या रिक्त जागांची भरती लवकरच 
थोरात म्हणाले, राज्यातील महसूल विभागात मोठ्या प्रमाणात कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे शासकीय कामे प्रलंबित राहत आहेत. कामाचा निपटारा होत नाही. तेव्हा राज्यातील महसूलच्या रिक्त जागा भरण्याबाबत लवकरच निर्णय घेऊन भरती प्रक्रिया सुरू केली जाईल.