Fri, Sep 25, 2020 14:20होमपेज › Sangli › शिरशी खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरास अटक

शिरशी खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरास अटक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शिराळा : प्रतिनिधी

तालुक्यातील शिरशी येथील चक्र भैरवनाथ मंदिरात  दि. 18 नोव्हेंबररोजी कृष्णात तुकाराम शिंदे (रा. कुंडल, ता पलूस) याच्या खूनप्रकरणी शिराळा पोलिसांनी आणखी एका संशयिताला अटक केली आहे. बाबासाहेब मोहन सुर्वे (वय 42, रा. नरसिंहपूर, ता. वाळवा) याला ठाणे येथे अटक करण्यात आली. त्याला दि. 2 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः मृत  कृष्णात शिंदे यांची पत्नी उज्वला  व संशयित बाबासो सुर्वे यांचे अनैतिक संबंध होते असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या खूनप्रकरणी उज्वला हिला यापूर्वी अटक करण्यात आली होती. खून झाल्यापासून सुर्वे फरारी होता. तो ठाणे येथे त्याच्या मावशीच्या घरी राहत होता. याची खबर शिराळा पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, प्रकाश पवार, उत्तम पवार, अमोल शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून  त्याला तिथे अटक केली.

संशयित उज्ज्वला व  सुर्वे  नरसिंहपूर येथे द्राक्ष बागेत कामास होते. त्यावेळी त्यांची ओळख झाली होती. त्यातून त्यांचे संबंध जुळले, अशी माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.  सुर्वे याला उज्वला हिने बोलावून घेतले. कृष्णात याला वाद मिटवितो म्हणून मोटारसायकलवरून शिरशी येथील चक्र भैरवनाथ मंदिरात नेले. त्या ठिकाणी रात्री त्याचे डोके विटा व दगडांनी  ठेचून त्याचा खून केला. या खुनात सुर्वे याला मदत करण्यासाठी आणखी कोण होते का, याचा तपास सुरू आहे. उपअधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाने पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील घोंगडे अधिक तपास करीत आहेत.