Wed, Aug 12, 2020 08:51होमपेज › Sangli › शिराळा तालुका कोरोनाच्या वेढ्यात

शिराळा तालुका कोरोनाच्या वेढ्यात

Last Updated: Jun 15 2020 9:52PM

वारणावती : मणदूर गाव गेल्या पंधरा दिवसांपासून पूर्णपणे सील आहे.वारणावती : आष्पाक आत्तार

सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि  निसर्गसौंदर्याने नटलेल्या शिराळा तालुक्यात कोरोनाचा  कहर सुरू आहे. तालुक्यात आजरोजी  79 रुग्ण आहेत.  त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे तब्बल 46 रुग्ण हे एका मणदूर गावातील आहेत.  यामुळे  मणदूर हे कोरोनासाठी ‘हॉटस्पॉट’ ठरले आहे.

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात  सर्वाधिक म्हणजे  79  रुग्ण आहेत.  यापैकी बहुसंख्य रुग्ण हे मुंबईतून आले आहेत. शिराळा तालुका हा डोंगरी तालुका आहे. तालुक्याच्या पश्‍चिम भागातील बहुसंख्य लोक कामानिमित्त मुंबईला स्थायिक  झाले आहेत. कोरोनाचा मुंबईत प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर ते आपापल्या गावी परतले. 

तालुक्यात सुमारे पंधरा ते सोळा हजार  मुंबईकर आले आहेत. एकट्या  मणदूर गावात  पाचशे ते सहाशे तर शिराळा पश्‍चिम भागात पंधराशे ते दोन हजारांच्या घरात मुंबईकर   आले आहेत. या सार्‍यांना होम क्‍वारंटाइन करण्यात आले होते; मात्र तरी देखील काहीजण बिनधास्त  फिरत होते. सुरुवातीला यापैकी काही जणांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती. नंतर मात्र  तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत.

कोरोनापासून अलिप्त ठरलेल्या शिराळा तालुक्यात सर्वप्रथम निगडी येथे दि. 25 एप्रिलरोजी पहिली महिला रुग्ण आढळली. ही रुग्ण  नुकतीच मुंबईवरून आली होती. लगेचच तिची चुलतीही बाधित झाल्याचे स्पष्ट झाले.  अंत्री, रिळे, मांगले, चिंचोली, मोहरे या गावांतही कोरानेचे रग्ण आढळू लागले. चांदोली धरणालगत असणार्‍या मणदूर गावात तर कोरोनाचा उद्रेक झाला. तेथे एका पाठोपाठ एक असे तब्बल 46 जण कोरोनाबाधित आढळले. ही संख्या  दिवसेंदिवस वाढतेच  आहे. 

या गावाभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ग्रामपंचायत आणि प्रशासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. पंधरा दिवसांपासून या गावात लॉकडाऊन आहे. त्यामुळे या लहानशा गावात  दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत.   मणदूर येथे सर्वप्रथम  आढळलेला  पहिला 81 वर्षीय वृद्ध रुग्ण कोरोनामुक्‍त झाला आहे. मात्र, मणदूर व मोहरे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  मणदूर तसेच तालुक्यातील बाधितांच्या वाढत्या संख्येची जबाबदारी मुंबईकरांवर जाते हे स्पष्टच आहे. 

तालुक्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पन्नास वर्षांच्या वरील व्यक्‍तींना  मिरजेला तर त्याखालील बाधितांना शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जात आहे. लॉकडाऊनपर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती. नंतर  मुंबईकर  ग्रामस्थ गावी परतू लागले. त्यातील अनेकांनी दक्षतेचे नियम  पाळले नाहीत. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. नागरिकांनीही स्वतः नियम पाळून खबरदारी घेण्याची गरज आहे.
- डॉ. प्रवीण पाटील
तालुका आरोग्य अधिकारी, शिराळा

मणदूर येथील स्थिती  हाताबाहेर चालली आहे. ग्रामपंचायतीमार्फत प्रयत्न केले जात आहेत; मात्र त्याला मर्यादा येत आहेत.  गावातील पशुधनाला चारा, औषध टंचाई या समस्या भेडसावू लागल्या आहेत.  याचवेळी  प्रशासनामार्फत प्रबोधनाची गरज आहे. 
- वसंत पाटील, सरपंच, मणदूर