Wed, Aug 12, 2020 08:55होमपेज › Sangli › शरद पवारांनी अडविला स्वामीनाथन आयोग

शरद पवारांनी अडविला स्वामीनाथन आयोग

Published On: Apr 17 2019 2:12AM | Last Updated: Apr 16 2019 9:21PM
सांगली : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या हितासाठी नेमलेल्या स्वामीनाथन आयोगाचा अहवाल शेतकर्‍यांचे कैवारी म्हणविणार्‍या माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दहा वर्षे अडवून ठेवला. तेच आज त्या आयोगाच्या अंमलबजावणीबद्दल कसा जाब विचारतात, असा सवाल भाजपचे प्रवक्‍ते माधव भंडारी यांनी केला.

हरिपूर (ता. मिरज) येथे महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. माजी आमदार नितीन शिंदे, महापौर संगीता खोत, भाजपचे नेते दीपक शिंदे, शिवसेनेचे नेते रावसाहेब घेवारे, बजरंग पाटील, अनिल शेटे, रासपचे प्रवक्‍ते लक्ष्मण हाक्के, शेतकरी संघटनेचे शीतल राजोबा, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, आदी प्रमुख उपस्थित होते. माणिकराव जाधव यांनी स्वागत केले. अरविंद तांबवेकर यांनी आभार मानले.

भंडारी म्हणाले, सन 2002 मध्ये एनडीए सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करून त्यासंदर्भात शिफारशीसाठी स्वामीनाथन आयोग नेमला. परंतु त्यानंतर 2004 मध्ये पुन्हा काँग्रेसचे आघाडी सरकार आले. अहवाल तयारही झाला. पण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग व कृषिमंत्री शरद पवार यांनी 2004  पासून 2014 पर्यंत स्वामीनाथन आयोगाचा अहवाल स्वीकारला नाही. मात्र, मोदी सरकार सत्तेवर येताच स्वामीनाथन आयोगाची आठवण कशी  झाली,  याचा पवार यांनी जाहीर खुलासा करावा. स्वामीनाथन आयोग मोदी सरकारने स्वीकारला. त्याची अंमलबजावणी सुरू केली.  जिल्ह्यातही पाणी योजना, महामार्ग, विविध योजनांच्या माध्यमातून संजय पाटील यांनी 70 वर्षांत झाला नाही इतका विकास केला आहे.  
शिंदे म्हणाले, एक उमेदवार वारसा सांगत  मते मागतो आहे, तर दुसरा उमेदवार जातीच्या नावावर मते मागतो आहे. पण भाजपचे उमेदवार मात्र 5 वर्षांत केलेल्या विकासाच्या कामांवर मते मागत आहेत. याचा विचार जनतेने करावा.

शिंदे म्हणाले, संजय पाटील यांनी टेंभू-म्हैसाळ-ताकारी या रखडलेल्या योजनांना निधी उपलब्ध करून दिला. कोट्यवधींचा निधी आणला. लक्ष्मण हाक्के म्हणाले,  50 वर्षे काँग्रेसची सत्ता असताना देखील पिण्याच्या पाण्याचा, रस्त्याचा, विजेचा प्रश्‍न सुटू शकला नाही. ते सोडविण्याचे काम  मोदी सरकारने केले.  

यावेळी माजी शहराध्यक्ष अविनाश मोहिते, नगरसेविका भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर, हरिपूरचे सरपंच विकास हणबर, उपसरपंच सरिता साळुंखे, जि. प. सदस्या शोभाताई कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, अशोक बोंद्रे, संभाजी सूर्यवंशी, परशराम शेरीकर, युवराज बोंद्रे आदी उपस्थित होते.