Thu, Jul 02, 2020 18:55होमपेज › Sangli › शाळा, महाविद्यालय, क्‍लासेस बंदच राहणार

शाळा, महाविद्यालय, क्‍लासेस बंदच राहणार

Last Updated: Jun 01 2020 10:28PM
सांगली  : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊन  शिथिल करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून नियमावली आली आहे. त्यानुसार शाळा, महाविद्यालय, क्‍लास बंदच राहणार आहेत. त्याशिवाय कंटेन्मेंट झोन वगळता इतरत्र मार्केट, दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहणार आहेत.  रात्री नऊ ते पहाटे पाच या वेळेत कर्फ्यू असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. 

ते म्हणाले, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात येत आहे. लग्न समारंभास सोशल डिटन्सिंग पाळून प्रशासनाने परवानगी दिली आहे.  समारंभासाठी केवळ 50 लोकांना उपस्थित राहता येणार आहे.

अंत्यविधीस मात्र  20 व्यक्तींनाच उपस्थित राहता येणार आहे.  वृद्ध, गरोदर महिला आणि दहा वर्षाखालील मुले यांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास परवानगी नाकारण्यात आलेली आहे. कंटेन्मेंट झोन क्षेत्रात किराणा, औषध दुकाने या अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंदच राहणार आहेत. रेल्वेने येणार्‍यांची तपासणी केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास पाचशे रुपये दंड केला जाईल.

स्टेडियम, मैदानावर वैयक्तिक  व्यायाम, सकाळी फिरण्यासाठी  नियमांचे पालन करुन परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलमध्ये पार्सल देण्यास परवानगी आहे. दुचाकीवर एकट्याला, तीन चाकी, चारचाकी वाहनात एक अधिक दोन प्रवासी अशी परवानगी आहे. जिल्हाअंतर्गत बस वाहतुकीस परवानगी आहे. यात 50 लोकांना एकावेळी प्रवास करता येणार आहे. मात्र सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे पालन   बंधनकारक आहे. 

तेे म्हणाले, परराज्यात गेलेल्या कामगारांनी परत येण्यासाठी अद्याप प्रशासनाबरोबर  संपर्क केलेला नाही. त्याचप्रमाणे उद्योजकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात आणि राज्यात इतर कोणत्या ठिकाणी कुशल कामगार उपलब्ध   आहेत, कामगारांना प्रशिक्षण याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. शासनाकडून वेळोवेळी येणार्‍या सूचनांप्रमाणे लॉकडाऊन शिथिल करण्यात येईल. 

ते म्हणाले,  जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संशयित असलेल्या 2 हजार 487 जणांची तपासणी झाली. त्यापैकी  2 हजार 310 रुग्ण निगेटिव्ह तर  112 रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यापैकी 63 बरे झाले. चार जणांचा मृत्यू झाला. 45 जणांवर उपचार सुरू  आहेत.

ते म्हणाले, वाळवा, आटपाडी आणि शिराळा तालुक्यात जास्त पॉझिटिव्ह रुग्ण असून 108 जण बाहेरून आले आहेत. चार रुग्णांना कोरोना कोणापासून झाला, ते समजलेले नाही.  जिल्ह्याच्या सीमेवर 31 ठिकाणी चेकपोष्ट नाके उभारण्यात  आले आहेत. जिल्ह्यात दि. 4 मे पासून आतापर्यंत इतर राज्यातून 11 हजार 934 तर इतर जिल्ह्यातून 40 हजार 576 लोक आले.

जिल्ह्यातून इतर राज्यात 35 हजार 555 तर इतर जिल्ह्यात 88 हजार 520 लोक गेले.  बाहेर जाण्यासाठी 89 हजार 812 अर्ज आले होते. त्यापैकी 35 हजार 627 जणांना  परवानगी  दिली.40 हजार 871 जणांना परवानगी नाकारण्यात आली. 

जिल्ह्यात हे बंदच राहणार 

हॉटेल, रेस्टारंट, चहा टपर्‍या, हातगाड्या, नाष्टा सेंटर, खानावळी
शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, प्रशिक्षण देणार्‍या संस्था, क्लास.
सिनेमागृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, क्रीडासंकुले, पोहोण्याचे तलाव
करमणूक संकुले, नाट्यगृहे, बार आणि ऑडिटोरियम  हॉल.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम.
सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे बंद  राहतील. 

जिल्हा बंदी उठवण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव

डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्याच्या सीमाभागातील अनेक कामगार, शेतकरी एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात ये-जा करीत असतात.त्यांची कामावर जायची अडचण होत आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बंदी उठवण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. याबाबत शासनाचे म्हणणे आणि पालकमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून आंतरजिल्हा बंदी उठवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. 

सुरू झालेली सलून, पार्लर पुन्हा बंद

डॉ. चौधरी म्हणाले, शासनाने यापूर्वीच्या लॉकडाऊन शिथिलता काळात  सलून, पार्लर सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र या घटकांमुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात आल्याने पुन्हा त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सलून, पार्लर सुरू करता येणार नाहीत.