Sat, Aug 08, 2020 02:16होमपेज › Sangli › सांगलीत अळ्यामिश्रित पाणी 

सांगलीत अळ्यामिश्रित पाणी 

Published On: Jan 21 2018 2:53AM | Last Updated: Jan 21 2018 1:04AMसांगली : प्रतिनिधी

मध्यवर्ती शहरासह अनेक उपनगरांमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून दूषित व अळ्यामिश्रित पाणीपुरवठा होऊ लागला आहे. पाणीपुरवठा यंत्रणेची दुरुस्ती सुरू असल्याचे कारण पाणीपुरवठा विभागाकडून दिले जात आहे. मात्र, नागरिकांकडून याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शहरातील रामनगर, गावभाग, पाटणे प्लॉट, गवळी गल्ली, खणभाग व शहराच्या पश्‍चिम परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अळ्यामिश्रित व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शनिवारी सांगलीतील दूषित पाणीपुरवठ्याबद्दल नागरिकांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात नागरिकांनी ऑनलाईन तसेच पाणीपुरवठा विभागाकडेही तक्रारी केल्या. गढूळ व अळ्यामिश्रित पाणीपुरवठ्याचा प्रकार वारंवार तीनही शहरांमध्ये आढळून येऊ लागला आहे. अनेकदा याविषयी संबंधित भागातील नागरिकांना आंदोलनेही केली आहेत.  तरीही कारभार सुधारत नसल्याचे आरोप होत आहेत.

गेल्या सहा दिवसांपासून शहराच्या पश्‍चिम भागात अळ्या व मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. एकीकडे 56 एमएलडी व 70 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण झाले, आता शुद्ध व मुबलक पाणी मिळेल, असा दावाही प्रशासन करीत आहे. दर आठवड्याला पाईपलाईन दुरुस्तीच्या नावे पाणीपुरवठा खंडित केला जातो. पण पुन्हा पाणीपुरवठ्याचा खेळ सुरूच आहे. महापालिका क्षेत्रात सध्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच दूषित पाण्यामुळे आजारांचे प्रमाण अधिक आहे. पुन्हा एकदा दूषित पाण्याने गॅस्ट्रोसह साथीचा आजार पसरून लोकांचे जीव गेल्यावर यंत्रणा जागी होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांतून होत आहे.