Mon, Aug 10, 2020 04:46होमपेज › Sangli › महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह, तासगाव, सावळज मधील दवाखाने सिल   

महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह, तासगाव, सावळज मधील दवाखाने सिल   

Last Updated: Jun 28 2020 7:01PM
तासगाव : पुढारी वृत्तसेवा

रविवारी वाघापूर येथील एका २२ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्‍यामुळे प्रशासनाने गावठाण २८ दिवसांसाठी कंटेन्मेंट झोन म्‍हणून घोषीत केले आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल सुर्यवंशी यांनी दिली आहे. 

दरम्यान कोरोना बाधित महिलने सावळज आणि तासगाव येथे एका खासगी दवाखान्यात उपचार घेतले आहेत. यामुळे प्रशासनाने दोन्ही दवाखाने तीन दिवसांसाठी सिल केले आहेत. डॉक्‍टर आणि सर्व कर्मचा-यांच्या स्त्रावाचे नमूने घेण्यात आले आहेत. सर्वांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना बाधित महिला सव्वा महिन्यांपूर्वी मुंबईहून आमणापूर येथे आली होती. तिथे १४ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण करुन आमणापूरहून वाघापूर येथे आली होती. यानंतर कोरोनाची लक्षणे आढळल्याने या महिलेला मिरज येथील रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्‍यान शनिवारी स्त्रावाचा नमूना घेण्यात आला होता. आज (रविवार) या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.

वाघापूर येथे कोरोनाबधित रुग्ण सापडताच, आरोग्य विभागाने गावाकडे धाव घेतली. चिंचणी प्राथमीक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पराग सोनवले यांनी आरोग्य विभागाची पथके तयार केली. ती पथके घरोघरी भेट देऊन ग्रामस्थांची तपासणी व मार्गदर्शन करत आहेत. निर्जंतुकीकरण करण्यासाठी गावात औषध फवारणी करण्यात आली. तर बाधित महिलेची सासू आणि सासरा यांना तासगाव येथे संस्थात्‍मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.