Wed, Jan 20, 2021 10:11होमपेज › Sangli › इस्लामपूर : जीप चालकाने मध्येच सोडल्याने ते कुटुंब २ दिवसांपासून चेकपोस्‍टवरच!

इस्लामपूर : जीप चालकाने मध्येच सोडल्याने ते कुटुंब २ दिवसांपासून चेकपोस्‍टवरच!

Last Updated: May 23 2020 6:46PM
इस्लामपूर : पुढारी  वृत्तसेवा 

धारावी झोपडपट्टीतील २१ जणांनी वाळवा तालुक्यात अवैधरित्या प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच, मुंबई येथील आणखी १२ जणांना अवैधरीत्या  वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील पोलिस चेक पोस्टवर सोडून जीप चालकाने मुंबईला पलायन केले आहे. पोलिसांनी या लोकांना सांगली जिल्ह्यात प्रवेश न दिल्याने गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील हे कुटुंब  पोलिस चेक पोस्टवर थांबून आहे. यामध्ये वृद्ध महिला व लहान मुलांचा समावेश आहे. 

गुरूवारी धारावी झोपडपट्टीतील २१ जण अवैधरित्या वाळवा तालुक्यात आले होते. त्यातील चौघेजण इस्लामपूर शहरात आले. यातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री वाशी येथील १२ जणांना घेऊन एक जीप चालक कोल्हापूर जिल्ह्यात निघाला होता. यासाठी त्याने या लोकांच्याकडून प्रत्येकी दोन हजार रूपये कागल येथे सोडण्यासाठी घेतले होते .

कोल्हापूरला जाण्यासाठी सर्वांचे परवाने काढले आहेत, असे त्या लोकांना सांगण्यात आले होते. मात्र कासेगाव चेक पोस्टच्या अलिकडेच या लोकांना सोडून त्या जीप चालकाने परत मुंबईला पलायन केले आहे. या लोकांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी कोणताही परवाना नाही. त्यामुळे कासेगाव येथील चेक पोस्टवर शुक्रवारी रात्रीपासून हे लोक थांबून आहेत. यामध्ये वृध्द महिला व  लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था नसल्याने या कुटुंबाचे हाल सुरू आहेत.  प्रशासनाने यावर मार्ग काढण्याची मागणी होत आहे. 

या प्रकारामुळे मुंबईपासून सांगली जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत लोक विनापरवाना कसा प्रवास करतात हाही प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे- बंगळूर महामार्गावर ठिकठिकाणी असणाऱ्या पोलिस चेक पोस्टचाही कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.