Thu, Jan 30, 2020 03:28होमपेज › Sangli › वाळू तस्करांची कर्मचार्‍यांना धक्‍काबुक्‍की

वाळू तस्करांची कर्मचार्‍यांना धक्‍काबुक्‍की

Last Updated: Jan 14 2020 11:21PM
कडेगाव : शहर प्रतिनिधी 
तालुक्यातील वांगी येथे वाळू तस्करांनी महसूल कर्मचार्‍यांना  धक्‍काबुक्‍की करून वाळूने भरलेले तीन ट्रॅक्टर-ट्रॉलीसह 18 हजारांचा मुद्देमाल  पळवून नेला. याबाबत चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात संशयित संजय साळुंखे, शेखर मोहिते, सोन्या लोंढे (सर्व रा. वांगी, ता. कडेगाव)  यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. याबाबत चिंचणीचे मंडळ अधिकारी संजय कदम यांनी फिर्याद दिली आहे.

चिंचणी-वांगी पोलिसांनी दिलेली  माहिती  अशी : तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक करणार्‍या तस्करांवर कडेगाव तहसीलदारांनी कारवाई सुरू केली आहे. बेकायदेशीर वाळू वाहतूक करणार्‍यांना लगाम घालण्यासाठी तहसीलदार यांनी तालुक्यात गस्तीसाठी पथके तैनात केली आहेत. 

सोमवारी रात्री वांगी येथील आरफळ कॅनॉलजवळ महसूल पथकाचे कर्मचारी  पहारा देत होते. संशयित साळुंखे, मोहिते व लोंढे हे वाळूने भरलेले तीन ट्रॅक्टर घेऊन जात होते. चिंचणीचे मंडल अधिकारी संजय कदम यांच्यासह कर्मचार्‍यांनी ही वाहने अडवली. “ती वाहने तहसील कार्यालय कडेगाव येथे घेऊन चला” असे सांगितले. त्यावेळी संशयितांनी बेकायदा  जमाव जमवून  महसूल अधिकारी कदम यांच्यासह कर्मचार्‍यांना धक्‍काबुक्‍की केली. 

तसेच दमदाटी, शिवीगाळ करून “तुमच्याविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करतो” अशी धमकी दिली.शासकीय कामात अडथळा निर्माण केला.तसेच वाळूने भरलेले तीन ट्रॅक्टर वाहने ,ट्रॉलीसह  मुद्देमाल पळवून नेला.   याबाबत चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात संजय कदम यांनी फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गोसावी   तपास करीत आहेत.