Sun, Sep 20, 2020 06:42होमपेज › Sangli › 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शरद पवार अर्जुनासारखे गोंधळलेले'

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शरद पवार अर्जुनासारखे गोंधळलेले'

Last Updated: Aug 03 2020 2:42PM
शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची मुख्यमंत्र्यांसह पवारांवर टीका

सांगली : पुढारी वृत्तसेवा

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. ऑनलाईन भूमीपूजनाची त्यांनी घेतलेली भूमिका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेशी विसंगत आहे. मुख्यमंत्र्यांसह शरद पवार अर्जुनासारखे गोंधळलेले आहेत, अशी टीका श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

भिडे म्हणाले, कौरवांशी युद्धावेळी अर्जुनाने हत्यारे खाली ठेवली होती. त्याची मनःस्थिती गोंधळाची झाली होती. तशीच स्थिती आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची झाली आहे. शरद पवार ज्ञानी आहेत. तरीही त्यांनी राम मंदिर निर्माणानंतर कोरोना जाईल असे वक्तव्य केले आहे. ते वक्तव्य राजकीय चलाखीचे असले तरी राष्ट्रीय दृष्ट्या त्यांचे वक्तव्य पाप आहे. मग असे वक्तव्य प्रत्येक बाबतीत करता येईल, असा टोलाही भिडे यांना पवार यांना लगावला.

मंदिराचे भूमीपूजन ऑनलाईन करावे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भिडे म्हणाले, बाबरी मशीद पाडण्यासाठी शिवसैनिक गेले होते. असे बाळासाहेब ठाकरे यांनी धाडसाने सांगितले होते. मात्र आताच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य त्यांच्या भूमिकेशी विसंगत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे काम चांगलेच आहे. आम्ही त्यांच्या कामावर समाधानी आहोत. मात्र मुख्यमंत्र्यांनी आता राज्यातील गाव अन् गाव पिंजून काढून कोरोनाचा सामना करण्यासाठी जनतेमध्ये सामर्थ्य निर्माण करावे, असेही भिडे यावेळी म्हणाले. 

 "