Tue, Oct 20, 2020 11:45होमपेज › Sangli › राजू शेट्टींनी नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करावेत; शेतकऱ्यांची मागणी  

राजू शेट्टींनी नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करावेत; शेतकऱ्यांची मागणी  

Last Updated: Oct 18 2020 5:12PM

चिंचणी येथील द्राक्षबागेची पाहणी करताना माजी खासदार राजू शेट्टी.तासगाव : पुढारी वृत्तसेवा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी (दि. १८) तासगाव तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्षबागा व खरीप हंगामी पिकांची पाहणी केली. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा राजू शेट्टी यांच्या समोर मांडल्या. शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. यासाठी शेट्टी यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.

या दौऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, युवा आघाडीचे महेश जगताप, तासगाव तालुकाध्यक्ष जोतीराम जाधव युवक राष्ट्रवादीचे दत्ता हावळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. चिंचणी येथील पाहणीवेळी विजय जाधव या द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

पावसामुळे पूर्ण द्राक्षबागेत पाणी साचून राहिले आहे. याचा परिणाम द्राक्षघडांवर झाला आहे. घड जिरलेत, डिझेल इंजिनने दोन दिवसांपासून शेतातील पाणी काढतोय, चिखल झाल्याने बागेत ट्रॅक्टर चालवता येत नाही. अशातच परत एकदा अवकाळीची शक्यता वर्तवली आहे. निसर्गानेच अवकृपा केली तर शेती तरी कशी करायची ? असा सवाल उपस्थित केला.

राजू शेट्टी यांनी कौलगे येथील ज्वारीच्या नुकसानीचीही पाहणी केली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शासनाकडे करणार आहे, अशी ग्वाही राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिली.

वाचा :दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

वाचा :सांगली : डंपरने वृद्धेला चिरडले 

 "