Mon, Aug 10, 2020 05:04होमपेज › Sangli › बापूंनी सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविले : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बापूंनी सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविले : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Last Updated: Jan 17 2020 10:31PM
इस्लामपूर :  प्रतिनिधी
राज्यातील जनतेच्या प्रश्‍नांना न्याय मिळवून देण्याचे महान कार्य लोकनेते राजारामबापू पाटील यांनी आपल्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत केले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी सहकाराच्या माध्यमातून वाळवा तालुक्यात समृद्धी आणली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

मुख्यमंत्री ठाकरे व  मंत्रीमंडळातील सहकार्‍यांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 36 व्या पुण्यतिथीनिमित्त  राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील त्यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.  याप्रसंगी ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले, स्व.बापूंनी सहकाराच्या माध्यमातून वाळवा तालुक्यात समृध्दी आणली आहे. त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात महसूल, उद्योग, वीज, अर्थ व ग्रामविकास आदी मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताना राज्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान केले आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना  पक्षाला विजय मिळवून दिला. त्यांनी जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळताना राज्यातील जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे महान कार्य केले आहे. 

राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री   हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री   सतेज पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, कृषि राज्यमंत्री विश्वजित कदम यांनीही  अभिवादन केले.राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील, उपाध्यक्ष विजय  पाटील यांनी ठाकरे यांचे कारखाना कार्यस्थळावर स्वागत केले. यावेळी कारखान्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.