Sun, Jan 17, 2021 04:59
जाहीर संपला, आता छुपा प्रचार; उद्या मतदान

Last Updated: Jan 14 2021 1:59AM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतीमधील 1 हजार 508 जागांसाठी 662 मतदान केंद्रांवर शुक्रवारी (दि. 15) मतदान होत आहे.  त्यासाठीचा जाहीर प्रचार बुधवारी सायंकाळी पाच वाजता समाप्त झाला. 

मतदानासाठी आता काही तास बाकी असल्याने नेते, पॅनेल प्रमुख आणि उमेदवार यांची मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धावाधाव सुरू आहे. छुपा  प्रचार सुरू झाला आहे. 

जिल्ह्यात 143 ग्रामपंचायतीमधील 1 हजार 508 जागांसाठी 5 हजार 65 उमेदवार मैदानात आहेत. काही अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी दुरंगी लढत होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीत लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेनेे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्या उपस्थित पदाधिकार्‍यांचा मेळावा घेऊन निवडणूक ताकदीने लढवण्याचे आवाहन केले होते. मात्र राजकीय पक्ष बाजूला ठेवत स्थानिक पातळीवर  सोईनुसार पॅनेल तयार झाले आहेत. 

गेल्या दहा दिवसात गावातील प्रमुख नेते आणि पॅनेलप्रमुख यांच्याकडून आरोप- प्रत्यारोपांचा  धडाका सुरू होता. सर्वांनीच मतदारांना विविध प्रकारची अनेक आश्वासने दिली   आहेत. आरोप-प्रत्यारोपांमुळे अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. 

या निवडणुकीत पक्षीय राजकारणापेक्षा गल्लीतला, भावकीतला उमेदवार किंवा स्थानिक विकासकामे आदि मुद्दे पुढे आले. गेल्या काही वर्षांपासून ग्रामपंचायतींना शासनाकडून थेट निधी उपलब्ध होत असल्याने तिथे जाण्यासाठी सर्वांनी जोर लावला आहे.  

तासगाव तालुक्यात  सर्वाधिक म्हणजे 36ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून 168 मतदान केंद्रे आहेत.    बहुसंख्य गावात खासदार संजय पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांच्या   गटात समोरासमोर लढत होत आहे.  

मिरज तालुक्यात  241 जागांसाठी 556  उमेदवार  नशिब आजमावत   आहेत. 180 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. आमदार सुरेश खाडे,  खासदार पाटील, काँग्रेस नेते विशाल पाटील, राष्ट्रवादी असे गट पडले आहेत.  म्हैसाळ येथे खासदार अमोल कोल्हे यांच्या सभेने आज प्रचाराची सांगता झाली. 

खानापूर तालुक्यात  11 गावात 86 जागांसाठी 200 उमेदवार रिंगणात असून 34 केंद्रांवर मतदान होत आहे. आटपाडी तालुक्यात 70 जागांसाठी 186 उमेदवार रिंगणात असून 30 केंद्रावर मतदान होत आहे.   
कडेगाव तालुक्यात 74 जागांसाठी 172 उमेदवार निवडणूक रिंगणात असून 35 केंद्रावर मतदान होत आहे. बहुसंख्य गावात कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम   विरुद्ध भाजप नेते पृथ्वीराज देशमुख यांच्या  समर्थकांत सामना होत आहे.   

पलूस तालुक्यात 12  गावात 136 जागांसाठी 295 उमेदवार रिंगणात   आहेत. 67 केंद्रावर मतदान होत आहे.  या ठिकाणीही काँग्रेस विरुद्ध भाजप  अशी लढत होत आहे. 

कवठेमहांकाळ तालुक्यात   10 ग्रामपंचायतीतील     78 जागांसाठी 169 उमेदवार रिंगणात असून 30 केंद्रावर मतदान होत आहे.    आमदार सुमनताई पाटील, खासदार पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे अशा तीन गटात काही ठिकाणी निवडणूक  होत आहे. 

जत तालुक्यात  28 ग्रामपंचायतीच्या 246 जागांसाठी 540 उमेदवार रिंगणात असून 107 केंद्रावर मतदान होत आहे.  आमदार विक्रम सावंत  आणि माजी आमदार विलासराव जगताप  यांच्या  समर्थकांच्यात बहुतांश ठिकाणी जोरदार लढत होत आहे.