Wed, Sep 23, 2020 01:08होमपेज › Sangli › आवडीच्या करिअरमधूनच प्रगतीच्या योग्य वाटा : डॉ. सुनील डोके

आवडीच्या करिअरमधूनच प्रगतीच्या योग्य वाटा : डॉ. सुनील डोके

Published On: Jun 03 2018 1:19AM | Last Updated: Jun 02 2018 8:25PMसांगली : प्रतिनिधी

निव्वळ पुस्तकी ज्ञान आणि घोकमपट्टी अभ्यासाने चांगले गुण जरूर मिळतील. शिक्षणही मिळेल पण त्यात रस नसेल तर त्याचा उपयोग काय? त्यामुळे लादलेले नव्हे, आवडीचे करिअर निवडा. त्यातच प्रगतीच्या  संपन्न वाटा आहेत, असे मत पुण्याच्या विश्‍वकर्मा विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. सुनील डोके यांनी व्यक्‍त केले. 

सांगलीत कच्छी जैन सेवा समाज भवन येथे संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘पुढारी एज्यु-दिशा 2018’   या प्रदर्शनात ‘शोधूया करिअरच्या नव्या दिशा’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, आमच्या काळात करिअरच्यादृष्टीने मार्गदर्शन मिळत नव्हते. पण आता त्याबाबत पालक, विद्यार्थ्यांत अधिक जागरुकता आहेच. शिवाय अनेक मार्गदर्शनपर उपाय आहेत. त्यादृष्टीने जागरुकता आली आहे. दहावी-बारावीनंतर अशा करिअरच्या हजारो मार्गांची कवाडेच खुली झाली आहेत. शैक्षणिक, उत्पादक, सेवा, बँकिंग, शासकीयसह विविध क्षेत्रात यादृष्टीने देश-विदेशात संधी उपलब्ध आहेत. अर्थात यामध्ये सर्वाधिक मोठे आव्हान हे शैक्षणिक क्षेत्रापुढे आहे. 

ते म्हणाले, आता शासकीय, अभियांत्रिकी, बँकिंग, संगणक, आयटी क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे या संधी निवडताना आपल्याला कोणत्या क्षेत्रात अधिक रस आहे, याची योग्य निवड करूनच तो मार्ग अवलंबायला हवा. अर्थात या सर्वच क्षेत्रांतून शैक्षणिक करिअरच्या संधी मिळू शकतात. त्यामुळे आपणाला कोणत्या क्षेत्रात जावे हे ठरावावे लागेल. 

सोबतच ग्राफीक डिझाईन, अ‍ॅनिमेशन, मीडिया आर्टिस्ट आदींमधून सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात करिअरच्या वाटा खुल्या आहेत. यातून रोजगार आणि व्यवसायाच्याही संधी उपलबब्ध होऊ शकतात. फेसबुक, ट्विटर आदी क्षेत्रातही आता तर मीडियामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसारखे स्किल डेव्हलपमेंटच्या संधी प्रसिध्दी आणि पैसा मिळवून देणार्‍या आहेत. त्यामुळे योग्य वाटा निवडा आणि सुखी व्हा.

घरावरून महिला, गाडीवरून माणसाचे मूल्य

डॉ. डोके म्हणाले, घराच्या अंगणावरून गृहिणी किती कर्तव्यदक्ष आहे, असे पूर्वी म्हटले जात होते. आता त्या संकल्पना बदलल्या आहेत. एवढेच नव्हे तर आता इंटिरियर हे एक करिअर बनले आहे. त्यानुसार घरावरून महिला आणि त्यांच्याकडे असणार्‍या सुसज्ज, दर्जेदार गाडीवरून त्यांची प्रतिष्ठा मोजली जाते. साहजिकच ऑफिस, शोरूम, कार्यालयापासून नवनव्या गाड्या निर्मितीत करिअरच्या संधी आहेत. तसेच घर, गार्डन सजावट हाही करिअरचा मार्ग आहे.