Sun, Jan 17, 2021 06:22
गव्हाणमध्ये आदर्श आचारसंहिता पायदळी, मतदानापुर्वीच पोस्टल मतदान 'व्हायरल'

Last Updated: Jan 15 2021 2:26AM
तासगाव : पुढारी वृत्तसेवा

गव्हाण (ता. तासगाव) येथे मतदानापुर्वीच काही जणांनी पोस्टल मतदानाच्या स्लिप सोशल मीडियावर 'व्हायरल' करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार गुरुवारी (दि.१४) सायंकाळी झाला.

गव्हाणमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडत आहे. एकीकडे उघड प्रचार समाप्त झाला असतानाही आदर्श आचारसंहिता पायदळी तुडवली जात आहे. येथील प्रभाग एक मधील विठ्ठलनगर भागातील एका महिला उमेदवाराने मंदिरासमोर चक्क मंडप टाकला. मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाला येणाऱ्या महिलांना हळदी कुंकू लावत प्रचार केला. हे दोन्ही प्रकार आचारसंहितेचे उल्लंघन व गोपनियतेचा भंग करणारे आहेत. याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी व आचारसंहिता कक्षाचे प्रमुख काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.

हळदी कुंकू कार्यक्रमाबाबत विरोधकांनी तहसिलदार कल्पना ढवळे आणि गटविकास अधिकारी दिपा बापट यांचेकडे तक्रार केली. पण कार्यक्रम संपला तरी आचारसंहिता कक्षाचे लोक त्याठिकाणी पोहोचले नव्हते. तेथे कारवाई करायला जाण्यासाठी गाडी नसल्याचे कारण सांगत प्रशासनाने याप्रकरणी बेफिकीरपणा दाखवला. प्रशासनाने आमची तक्रार गांभीर्याने घेतली नाही, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

एक महिला उमेदवार मंडप टाकून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमादरम्यान प्रचार करत आहे, अशी तक्रार आली होती. त्याठिकाणी पथकही पाठवण्यात आले आहे. मात्र आमच्याकडे गाडी वेळेत उपलब्ध होऊ न शकल्याने जाण्यास विलंब झाला. तर पोस्टल मतदान होताच त्याचे फोटो काढून ते सोशल मीडियावर 'व्हायरल' करणाऱ्याच्या विरोधात तक्रार आल्यास कारवाई करता येईल. तसेच सबंधित मत अवैध ठरवता येईल. मात्र त्यासबंधीचे अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आहेत. 
- दिपा बापट, 
 आचारसंहिता कक्ष प्रमुख तासगाव तालुका