Sun, Sep 20, 2020 03:40होमपेज › Sangli › मराठा तरुणांना पोलिसांच्या नोटिसा

मराठा तरुणांना पोलिसांच्या नोटिसा

Last Updated: Sep 17 2020 2:14AM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी याप्रकरणी राज्य सरकारचा निषेध केला आहे.  

मोर्चातील पदाधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात विविध ठराव करण्यात आले. समाजातील  तरुणांना आंदोलन करण्याआधीच प्रतिबंधात्मक नोटिसा काढण्यात येत आहेत. आंदोलन सुरू होण्याआधीच चिरडण्याचा सरकार जो प्रयत्न केला जात आहे, त्याचा जाहीर निषेध बैठकीत करण्यात आला.  त्याशिवाय नोटिसा तत्काळ मागे घेण्याचे आवाहन सरकारला करण्यात आले. 

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ दिला जात नाही तोपर्यंत राज्यात कोणत्याही पद्धतीची नोकर भरती सरकारने करू नये,   महाराष्ट्राचे महाधिवक्‍ता आशुतोष कुंभकोणी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी  फारसे  प्रयत्न न केल्याने त्यांचा जाहीर निषेध करून शासनाने त्यांची नियुक्‍ती तत्काळ रद्द  करण्याची मागणी करण्यात आली. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेश प्रक्रियांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवणार्‍या राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यावर तत्काळ कारवाई करावी असे ठराव करण्यात आले.  दरम्यान, खासदारांना देण्यात येणार्‍या पत्राचा नमुना तयार करण्यात आला आहे. 

आरक्षण निर्णयापर्यंत पोलिस भरती थांबवा

राज्य सरकारने पोलिस भरती जाहीर केली आहे. सुमारे बारा हजार पोलिसांच्या जागा भरण्यात येणार आहेत. आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने त्याचा फटका समाजातील तरुणांना बसणार आहे. त्यामुळे आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत पोलिस भरती थांबवण्यात यावी, अथवा आरक्षणाचा लाभ भरतीमध्ये मराठा समाजातील तरुणांना  द्यावा, अशी मागणी क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी केली आहे.

 "