Wed, Aug 12, 2020 09:02होमपेज › Sangli › डॉ. विश्‍वजित कदम यांना पाठबळ द्या

डॉ. विश्‍वजित कदम यांना पाठबळ द्या

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 11:48PMकडेगाव : शहर प्रतिनिधी 

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत  डॉ. विश्‍वजित  कदम यांच्या रूपाने नवे नेतृत्व  तयार होत आहे. जसे पतंगरावांच्या पाठीशी  उभे राहिलात, तसेच विश्‍वजितच्या पाठीशीही उभे राहा, असे आवाहन  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  केले. 

येथे डॉ. विश्‍वजित कदम यांनी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून सोमवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार मोहनराव कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, आमदार सुमन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, जयश्री पाटील, आमदार आनंदराव पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार सदाशिवराव पाटील, निरंजन डावखरे, जयकुमार गोरे, डॉ. शिवाजीराव कदम, सौ. स्वप्नाली कदम, शांताराम कदम, महेंद्र लाड, डॉ. जितेश कदम उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, डॉ. विश्‍वजित कदम यांना सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. स्व. पतंगराव कदम यांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी विश्वजित यांना प्रचंड मतांनी विजय करा. एका वेगळ्या अध्यायाची सुरुवात करायची आहे.  नेतृत्वाला जपावे लागते. ती जबाबदारी जनतेची असते. या निवडणुकीत ती जबाबदारी पार पाडायची आहे.

ते म्हणाले, विश्वजित यांच्यावर पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी  मोठी जबाबदारी देत होते. परंतु विश्वजित यांनी ती नाकारून पलूस-कडेगावच्या जनतेसाठी वेळ देणार असल्याचे सांगितले. 

डॉ.  कदम म्हणाले,  काळजावर दगड ठेवून आज या ठिकाणी मी उभा आहे. (स्व.) पतंगराव कदम यांचे कर्तृत्व आणि  व्यक्तिमत्व फार मोठे होते. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले.  यापुढे मी आयुष्यभर कडेगाव-पलूसच्या जनतेची सेवा करणार आहे.  डॉ. कदम यांचे स्वप्न  पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे .

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर.पी.आय.चे मी आभार मानतो. त्यांनी डॉ. विश्वजित यांना पाठिंबा दिला. इतर पक्षांनीही याबाबत विचार करावा. विरोधकांना माझे आवाहन आहे, त्यांनीही  पाठिंबा द्यावा.  इतिहासात नोंद होईल, असे मताधिक्य विश्वजित यांना द्या.

विलासराव शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी व काँग्रेस आता एक झाली आहे. त्यामुळे मतभेद विसरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलेले आदेश कार्यकर्त्यांनी पाळावेत. भाजपनेही निवडणूक बिनविरोध करावी. प्रतीक पाटील म्हणाले,  ही पोट निवडणूक स्पर्धेची  नाही. त्यामुळे डॉ. पतंगराव कदम यांनी केलेले काम पाहून ही निवडणूक बिनविरोध करावी.

आमदार सतेज पाटील, आमदार सदाशिवराव पाटील, जयकुमार गोरे, सत्यजित देशमुख, जयश्री पाटील, भीमराव मोहिते, डॉ. पृथ्वीराज चव्हाण, अ‍ॅड. मदने, खाशाबा दळवी आदींनी भाषणे केली. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी प्रास्ताविक केले. 

उद्योगपती अविनाश भोसले, महापौर हारूण शिकलगार, नगराध्यक्षा आकांक्षा जाधव, उपनगराध्यक्ष साजिद पाटील, विजय शिंदे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.