Tue, Sep 22, 2020 07:09होमपेज › Sangli › पैशांच्या वादातून एकावर खुनीहल्ला

पैशांच्या वादातून एकावर खुनीहल्ला

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 24 2017 11:39PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

पेंटिंग व्यवसायातील भागीदारीत पूर्वी झालेला वाद आणि अहिल्यानगर येथील वर्चस्ववादातून शंकर मुरलीधर पवार (वय 28, रा. अहिल्यानगर) याच्यावर तलवारीने खुनीहल्ला करण्यात आला. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास माधवनगर (ता. मिरज) येथील कॉटन मिलसमोर ही घटना घडली. याप्रकरणी पाचजणांविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विजय ओलेकर, संभ्या आवटी व अनोळखी तिघे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जखमी पवार याने फिर्याद दिली आहे. जखमी शंकर व विजय ओलेकर दोघेही पेंटिंगचे काम करतात. पूर्वी ते भागीदारीत करीत होते. मात्र पैशांवरून वाद झाल्याने त्यांनी भागीदारीत काम करणे बंद केले होते.  त्यामुळे शंकर सध्या एकटाच पेटिंगची कामे घेत होता. 

आज दुपारी बाराच्या सुमारास शंकर मोटारसायकलवरून माधवनगर येथे गेला होता. परत येताना कॉटन मिलजवळ तो थांबला होता. त्यावेळी विजय ओलेकर संशयितांसह तेथे आले. भागीदारीच्या व्यवसायातील पैशाचा हिशोबाचा जाब विचारत त्याने व त्याच्या साथीदारांनी तलवारीने हल्ला केला. डोके, दोन्ही दंड आणि गुडघ्यावर खोलवर वार करण्यात आले आहेत. नागरिकांनी जखमी शंकरला सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. 

त्याच्यावर तेथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.  रात्री उशीरा याप्रकरणी विजय ओलेकरसह  पाचजणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.