Wed, Aug 12, 2020 11:41होमपेज › Sangli › आता तरी ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घाला : आमदार जगन्नाथ शिंदे (video)

आता तरी ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घाला : आमदार जगन्नाथ शिंदे (video)

Published On: Aug 27 2019 6:42PM | Last Updated: Aug 27 2019 6:42PM

आमदार जगन्नाथ शिंदे सांगली : प्रतिनिधी 

गेल्या काही वर्षात ऑनलाइन वस्तू विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे. मात्र इतर वस्तूप्रमाणे औषधे ऑनलाइन देणे चुकीचे आहे. महापुराच्या काळात औषध पुरवठा करण्यासाठी औषध विक्रेता संघटना धावून आली. ऑनलाईन कंपन्या कुठेही ही दिसल्या नाहीत. त्यामुळे सरकारने आता तरी ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालावी. त्यांना परवानगी देऊ नये, अशी मागणी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे यांनी आज (ता.२७) पत्रकार परिषदेत केली.

महापुरात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने सरकारने ही घरे बांधून द्यावीत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर, महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, गेल्या काही वर्षापासून औषध विक्री ऑनलाइन पद्धतीने मोठ्या प्रमाणात होत आहे. इतर वस्तू आणि औषधे यामध्ये फरक आहे.  प्रशिक्षित औषध विक्रेत्या कडूनच औषध विक्री व्हायला हवी. ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालावी यासाठी आम्ही तीन-चार वेळा आंदोलने छेडली. मात्र सरकारने ही बाब गांभीर्याने घेतले नाही. महापूरासारख्या आपत्ती काळात या कंपन्या औषध पुरवठा करू शकणार नाहीत. औषध पुरवठा वेळेवर न झाल्यास रोगराई पसरेल. मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याचा धोका आहे. त्याशिवाय ऑनलाईन औषध विक्रीला परवानगी दिल्यास देशभरातील सुमारे दहा लाख व्यवसायिक आणि त्याचे कुटुंबीय उघड्यावर पडतील. त्यामुळे ऑनलाईन औषध विक्रीला आमचा विरोध कायम राहील.

शिंदे म्हणाले, महापुरामुळे मोठ्याप्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. सर्वसामान्य लोकांना सावरण्यासाठी सरकारने ही घरे मोफत बांधून द्यायला हवेत त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी करणार आहे.