Wed, Aug 12, 2020 08:59होमपेज › Sangli › अंदाज, आडाखे, पैजा, सट्टा अन् धाकधूक 

अंदाज, आडाखे, पैजा, सट्टा अन् धाकधूक 

Published On: Apr 27 2019 2:00AM | Last Updated: Apr 26 2019 8:56PM
सांगली : प्रतिनिधी

सांगली   लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचा अंदाज कोणालाच लागेना झाला आहे. कोणी संजय पाटील थोडक्यात येणार, तर कोणी विशाल पाटील बाजी मारणार, असे सांगत आहेत. काहीजण गोपीचंद पडळकर यांची हवा असल्याचे बोलत आहेत. जिल्ह्यात अंदाज, आडाखे, चर्चेला उधाण आले आहे. काही ठिकाणी पैजा, सट्टा लावला जात आहे. परिणामी उमेदवार व कट्टर समर्थक कार्यकर्त्यांत मात्र धाकधूक व अस्वस्थता वाढली आहे.

पहिल्यांदा महायुतीचे संजय पाटील यांच्याविरोधात उमेदवारच ठरत नसल्याने  ही निवडणूक एकतर्फी वाटत होती. पण विशाल पाटील व गोपीचंद पडळकर   यांच्या दमदार एंंट्रीने मैदान भलतेच रंगले. मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी रंगतदार निवडणूक झाली. तीनही उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत प्रचाराचा धुरळा उडवून दिला. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.  

उमेदवार व कार्यकर्त्यांनी कधी नव्हे तो जिल्हा पालथा घातला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे, खासदार राजू शेट्टी, आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, अभिनेते प्रकाश राज, आमदार जयंत पाटील, आ. विश्‍वजीत कदम यासह अनेक राष्ट्रीय व राज्य स्तरावरील नेत्यांनी सांगलीत गांभिर्याने लक्ष घातले. सोशल मीडियावर तर प्रचाराला भलताच जोर आला होता.

 राज्यभरात सांगलीची लढत लक्षवेधी ठरली. सर्वच उमेदवारांनी पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात प्रचार करुन शेवटच्या आठवड्यात सांगली, मिरजेत जोर दिला. प्रत्येक  विधानसभा मतदारसंघात लीड घेण्यासाठी   सर्वच उपायांचा वापर केला. फोडाफोडी, जातीचे कार्ड यांचीही चर्चा झाली.त्यामुळे चुरस शेवटपर्यंत कायम राहिली. त्यामुळे 65 टक्क्यांपेक्षा जादा मतदान झाले.  यात कोणीही जादा मताधिक्याने  नाही,  पण जो उमेदवार येणार तो घासूनच, अशी स्थिती मतदानापर्यंत राहिली.

त्यामुळे आता कोण जिंकणार, किती लीडने येणार याची चर्चा सुरू आहे. कोण कोठे लीड घेणार याची गावा-गावांत चर्चा सुरू आहे. तालुकानिहाय, विधानसभा मतदारसंघानुसार आडाखे बांधले जात आहेत. राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्येकाकडून अंदाज घेत आकडेमोड करीत आहेत. कट्टर समर्थकांनी  पैजा लावल्या आहेत. काहींनी धनादेश एकमेकांना देऊन स्टॅम्प पेपरवर लेखी करार केले आहेत. 

संजय पाटील यांचे लीड कमी होईल, पण त्यांचा निसटता विजय होईल, असा काहींजणांचा अंदाज आहे.  विशाल  पाटील यांची प्रचारात आघाडी असल्याने त्यांचा विजय निश्‍चित असल्याचे काहीजण सांगत आहेत. तसेच जिल्ह्याच्या पूर्व भागातून गोपीचंद चमत्कार घडवतील, अशी चर्चा सुरू आहे. सट्टा बाजारात तीनही उमेदवारांना पसंती मिळत आहे. महिनाभर सट्टा बाजारात उलाढाल वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात प्रत्येक गावात, शहरात, कट्ट्यावर, शिवारात केवळ  निकालाची चर्चा सुरू आहे.   येणारा  उमेदवार ‘ठासून न्हाय तर घासून येणार’ असल्याचे दिसत आहे.

‘हातकणंगले’मध्ये काय होणार? 

सांगली जिल्ह्यातील वाळवा व शिराळा हे दोन तालुके हातकणंगले मतदार संघात आहेत. तिथे खासदार राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांची लढत लक्षवेधी ठरली आहे. पहिले काही दिवस शेट्टी यांच्या बाजूने असणारी ही लढत शेवटच्या आठवड्यात चुरशीची झाली. शेट्टी यांना माने यांनी टफ फाईट दिल्याची चर्चा आता रंगते आहे. काहीजण शेट्टी यांचे लीड गेल्याखेपेपेक्षा कमी होईल, असे सांगत आहेत. तर अनेकांना चमत्कार होईल, अशी शक्यता वाटत आहे.