Thu, Jul 02, 2020 18:49होमपेज › Sangli › कडेगाव तालुक्यात पारंपरिक शेतीला बगल 

कडेगाव तालुक्यात पारंपरिक शेतीला बगल 

Published On: Jul 09 2018 1:07AM | Last Updated: Jul 08 2018 10:57PMकडेगाव : रजाअली पिरजादे 

कडेगाव तालुक्यात पारंपारिक शेतीला बगल देवून शेतकरी नवनवीन पिकांचे प्रयोग करताना दिसत आहे. पारंपारिक पीकपॅटर्न  बदलताना दिसत असून, शेतकर्‍यांमध्ये मातीतून सोने उगवण्याची स्पर्धा दिसू लागली आहे.कडेगाव तालुका दुष्काळी आणि डोंगराळी तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु सिंचन योजनांमुळे या तालुक्याचा कायापालट होताना दिसत आहे.तालुक्याचे एकूण 58 हजार हेक्टर क्षेत्र आहे. पूर्वी हा तालुका खानापूर तालुक्यात समाविष्ट होता. सन 2004 साली पंचावन्न गावांचा कडेगाव हा नवीन तालुका झाला.सोनहिरा खोरा, शाळगाव खोरा आणि नेर्ली खोरा मिळून हा तालुका होतो.संपूर्ण परिसर सह्याद्री पर्वतांच्या रांगाने वेढला आहे. उरलेला वीस टक्के परिसर म्हणजे कडेपूर ते आंबेगावपर्यंत संपूर्ण पठार येतो. तालुक्यात आठमाही वाहणार्‍या येरळा आणि नांदणी या दोन नद्या आहेत.

पूर्वी संपूर्ण  शेती पावसावर आणि विहिरींच्या पाण्यावर अवलंबून होती. खरीप आणि रब्बी पिके  कशीबशी पदरात पडायची. साहजिक या नैसर्गिक परिस्थितीमुळे या तालुक्यातील शेतकरी कष्टाळू बनला. तालुक्यातील शेतकर्‍यांना टेंभू, ताकारी या सिंचन योजनामुळे सुख मिळाले. सिंचन योजनांचे पाणी तालुक्यात आल्याने मातीतून सोने पिकण्यास सुरुवात झाली आहे. दुष्काळाच्या खस्ता खाणार्‍या येथील शेतकर्‍यांना पाण्यामुळे जीवदान मिळाले आहे. 

ऊस शेतीत अमूलाग्र बदल झाला आहे. जुन्याकाळातील ऊस बियांना बगल देवून शेतकरी आता नवीन जातीचे बियाणे वापरून उत्पन्नात वाढ घेताना दिसत आहे. तर दुष्काळात नामशेष झालेली हळद आणि आले पीक आता पुन्हा जोर धरू लागले आहे. तालुक्यात आले आणि हळद पिकाखाली  दोनशे हेक्टर क्षेत्र आहे. याबरोबर ढबू ,कारली आणि काकडी सारखी दररोज पैसे देणारे पिकही शेतकरी करू लागला आहे. 

शेतकर्‍यांचे नवीन प्रयोग...

ताकारी, टेंभू सिंचन योजनामुळे पारंपारिक पिकाऐवजी ऊस शेती, भाजीपाला आणि फळबागांची शेती मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसत आहेत. तालुक्यात सुमारे वीस हजार हेक्टर ऊस पिकाचे क्षेत्र आहे. तर भाजीपाला, फळबागांचे सुमारे पाचशे हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये प्रामुख्याने डाळिंब, टोमॅटो, काकडी, पपई , पेरू, केळी यांसारखे पिके  घेवून शेतकर्‍यांनी नवीन प्रयोग करण्यास प्रारंभ केला आहे.