Mon, Mar 08, 2021 17:42
सांगली महापालिका : जयंत पाटलांनी 'असा' केला विरोधकांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम

Last Updated: Feb 23 2021 7:11PM

सांगली : स्वप्निल पाटील

नाट्यमय वळणावर पोहोचलेल्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादीकडून भाजपचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करण्यात आला आहे. भाजपचे पाच नगरसेवक फोडून राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदी तर काँग्रेसने उपमहापौरपदी बाजी मारली आहे. त्यामुळे भाजपमध्ये असलेली दुही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

सांगली महापालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं 'करेक्ट कार्यक्रम' करून भाजपला पाडलं खिंडार

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत ७८ नगरसेवक आहेत. त्यातील ४३ नगरसेवक असणाऱ्या भाजपची महापालिकेवर सत्ता होती. परंतु गेल्या अडीच वर्षात भाजपमध्येच गट निर्माण झाले होते. त्यामुळे काठावरचे बहुमत असलेल्या भाजपची महापौर, उपमहापौर निवडणुकीत धाकधूक वाढली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सांगलीत तळ ठोकून होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील हे या सर्व घटनांवर लक्ष ठेवून होते.

महापौर निवडणुकीत भाजपचे पाच नगरसेवक फुटून महाविकास आघाडीच्या गोटात गेले. तर भाजपचे दोन सदस्य तटस्थ राहिले, तर दोघांनी कोरोनामुळे दांडी मारली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांनी ३९ विरूद्ध ३६ मतांनी भाजपचे धीरज सूर्यवंशी यांचा पराभव केला. तर उपमहापौर निवडणुकीत काँग्रेसचे उमेश पाटील यांनी भाजप सहयोगी सदस्य गजानन मगदूम यांचाही ३९ विरूद्ध ३६ मतांनी पराभव केला. त्यामुळे नाट्यमय वळणावर पोहोचलेल्या महापौर, उपमहापौर निवडीला ‘करेक्ट’ कार्यक्रमाने पूर्णविराम मिळाला.

अनिकेत कोथळे खून प्रकरण : 'घातपात झाल्याचे मला नंतर समजले'

नगरसेवकांचा घोडेबाजार...

महापौरपदाची निवडणूक प्रक्रिया जाहीर होताच भाजपमधील नाराज ९ सदस्य ‘नॉटरिचेबल’ झाले होते. त्यांना शोधून पुन्हा भाजपच्या गोटात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. परंतु हे सदस्य शेवटपर्यंत भाजपच्या गोटात सामील झाले नाहीत. यातील पाच जणांनी काँग्रेस - राष्ट्रवादीला मतदान केले.  दोन जण तटस्थ राहिले तर दोघे कोरोनामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी अनुपस्थित राहिले.

मिरज पंचायत समिती निवडणुकीपासून ‘बंडखोरीला’ सुरुवात...

मिरज पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता असताना देखील भाजपचे दोन सदस्य फुटून काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गेले होते. त्यामुळे भाजपची सत्ता असलेल्या पंचायत समितीत काँग्रेसचे अनिल आमटवणे हे उपसभापती झाले होते. त्यामुळे पंचायत समितीमधील भाजप बंडखोरीचा परिणाम महापालिकेत देखील झाला असल्याचे दिसून आले.

जिल्हा परिषदेवर खिळल्या नजरा...

सांगली जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या सहयोगाने भाजपची सत्ता आहे. या ठिकाणी अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दि. २५ फेब्रुवारी रोजी अध्यक्षपद बदलाबाबतची बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु आता मिरज पंचायत समिती, सांगली महापालिकेतील सत्तांतरमुळे भाजपने जिल्हा परिषद अध्यक्षपद बदलाबाबत धास्ती घेतली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद बदलामध्ये शिवसेनेने पाठिंबा काढून घेतल्यास भाजपची सत्ता जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद बदलणार की आहे त्या विद्यमान पदाधिकार्‍यांना मुदतवाढ देणार, याकडे सार्‍यांच्या नजरा खिळल्या आहेत.

भाजपचे खासदार संजय पाटील - राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांची जवळीक?

भाजपचे खासदार संजय पाटील हे सांगलीतील भाजपच्या कार्यक्रमांना दांडी मारत असल्याचे दिसून येते. तसेच त्यांची जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत जवळीक देखील वाढली आहे. महापालिका निवडणुकी संदर्भात घेण्यात आलेल्या कोअर कमिटीच्या बैठकांना देखील खासदार पाटील यांनी दांडी मारून जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.