Sun, Feb 28, 2021 06:07
सांगली महापालिकेत भाजपला धक्का, राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी महापौर तर काँग्रेसचे उमेश पाटील उपमहापौर

Last Updated: Feb 23 2021 1:52PM

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली महापौर, उपमहापौर पदासाठी आज मंगळवारी (दि.23) निवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं 'करेक्ट कार्यक्रम' करून भाजपला खिंडार पाडलं. महापालिकेत सत्ता परिवर्तन झाले असून भाजपला धक्का बसला आहे. महापौरपदी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी (राष्ट्रवादी ) विजय झाले. सूर्यवंशी यांना 39 मते पडली. तर भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांना 36 मते पडली. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील विजयी झाले. त्यांना 39 मते मिळाली.

मतदानावेळी भाजपचे शिवाजी दुर्गे, आनंद देवमाने अनुपस्थित राहिले. भाजपची 4 मते व एक सहयोगी मत फुटले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे 7 नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ होते. त्यामुळे भाजपची सत्ता धोक्यात आली होती. तेच चित्र आज निवडणुकीवेळी दिसून आले. अखेर महापालिकेत सत्ता परिवर्तन झाले आहे.

नगरसेवकांची पळवापळवी, घोडेबाजार, सौदेबाजी यामुळे महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत यावेळी प्रथमच एवढी मोठी चुरस पहायला मिळाली. महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौरपदासाठी गजानन मगदूम हे भाजपचे उमेदवार होते. महापालिकेत भाजपचे संख्याबळ 41 व सहयोगी नगरसेवक 2 असे एकूण 43 आहे. बहुमतासाठी 39 नगरसेवकांची गरज होती. पण भाजपला धक्का देत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराने एवढी मते मिळवत बाजी मारली.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा महापौरपदाचा व उपमहापौरपदाचा उमेदवार निश्चित करण्याचा सर्वाधिकार जयंत पाटील व विश्वजित कदम यांना देण्यात आला होता.