Mon, Nov 30, 2020 13:13होमपेज › Sangli › म्हमद्या नदाफ टोळीकडून दोघांवर खुनी हल्ला

म्हमद्या नदाफ टोळीकडून दोघांवर खुनी हल्ला

Last Updated: Nov 22 2020 11:55PM
मिरज : पुढारी वृत्तसेवा

फेसबुक पोस्ट आणि खंडणीच्या वादातून सांगलीतील म्हमद्या नदाफ टोळीतील गुन्हेगार मोहसीन पठाण व त्याच्या साथीदारांनी मिरजेत शहर पोलिस ठाण्यासमोरच दोघांवर कोयत्याने खुनीहल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी पठाण याला कोयत्यासह रंगेहाथ अटक केली.

या हल्ल्यात युनूस नदाफ आणि इम्रान नदाफ हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिरजेतील युनूस नदाफ या तरुणाने सांगलीतील गुन्हेगार म्हमद्या नदाफ याचे छायाचित्र वापरून टिपू  सुलतान जयंतीच्या शुभेच्छा देणारी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. फेसबुकवरील पोस्ट पाहून म्हमद्या नदाफ टोळीतील मोहसीन नदाफ (रा. शंभरफुटी रोड, सांगली) याने युनूस नदाफ याच्याशी संपर्क साधला. 

त्यानंतर मोहसीन याने युनूस याला ‘म्हमद्याशी तुझा काय संबंध, त्याचा फोटो का वापरला,’ असा जाब विचारून युनूस याला भेटायला बोलावले. त्यानुसार रविवारी दुपारी मोहसीन पठाण हा आठ ते दहा साथीदारांसोबत मिरजेत आला. मिरजेत शहर पोलिस ठाण्यासमोर युनूस व मोहसीन या दोघांची भेट झाली.

त्यावेळी मोहसीन याने युनूसकडे  “फेसबुकवर म्हमद्याचे छायाचित्र वापरल्याबद्दल 50 हजार रुपये दे” अशी मागणी केली. युनूस याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांत जोरदार वादावादी झाली. पैसे न दिल्याने मोहसीन याने युनूसवर कोयत्याने हल्ला केला. अचानक हल्ला झाल्याने युनूस गंभीर जखमी झाला. त्यावेळी युनूस याचा साथीदार इम्रान नदाफ हा मध्यस्थी करून हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरही कोयत्याचे वार झाले.  हल्ल्याची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार बळीराम पवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोहसीन याला कोयत्यासह ताब्यात घेतले. घटनेनंतर मात्र मोहसीन याच्या अन्य साथीदारांनी पलायन केले. 

युनूस नदाफ आणि इम्रान नदाफ या दोघांच्या हातावर, डोक्यावर, पोटावर कोयत्याचे वर्मी घाव बसले असून दोघांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मोहसीन पठाण व त्याच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य फरारी हल्लेखोरांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.