Thu, Nov 26, 2020 20:04होमपेज › Sangli › 'शेतकरी संघटनांची कारखानदारांशी सेटलमेंट'

'शेतकरी संघटनांनी कारखानदारांशी सेटलमेंट करून एफआरपीचे दर पाडले'

Last Updated: Nov 22 2020 3:41PM

file photoमिरज : पुढारी वृत्तसेवा

काही शेतकरी संघटना कारखानदारांशी सेटलमेंट करून एफआरपीचे दर पाडत आहेत. या संघटना सरकारमान्य शेतकरी संघटना बनल्या आहेत. त्यांचा सरकारी धोरणांना पाठिंबा असल्याचे सांगत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका केली. ते मिरजेत पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले, शेतकर्‍यांच्या जिवावर संघटना काढून काहींनी मंत्रीपदे भोगली तर काहीजण आमदारकीच्या मागे लागले आहेत. या संघटनांचा सरळसरळ सरकारी धोरणांना पाठिंबा आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आता थेट कारखानदारांशीच सेटलमेंट करून एफआरीचे दर पाडले जात आहेत. कारखानदारांना 2 हजार 850 रुपये एफआरपी देणे परवडत असताना सेटलमेंट करून 2 हजार 200 रुपये एफआरपी घेतली जात आहे. याचा संघटना आणि कारखाना या दोघांना फायदा होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची मात्र फसवणूक होत आहे.

ऊसावर सर्व प्रक्रिया करून कारखानदारांनी प्रतिटन 4 हजार रुपये दर दिला पाहिजे. परंतू तथाकथित शेतकरी नेते हा फरक का मागत नाहीत? असा सवाल करून त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. तसेच शेतकर्‍यांची फसवणूक रोखण्यासाठी दि. 28 नाव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान जनप्रबोधन यात्रा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.