होमपेज › Sangli › अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मिरजेत बलात्कार;  एकास अटक

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मिरजेत बलात्कार;  एकास अटक

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 11:36PMमिरज : शहर प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यातील बोरगाव येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून सदलगा पोलिसांनी तो येथील महात्मा गांधी चौकी पोलिसांकडे वर्ग केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास मिरज पोलिसांना करावा लागणार आहे. 

पीडित शाळकरी मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. त्यांची 15 वर्षांची मुलगी व तिची मैत्रीण दि. 29 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी शाळेला जात होत्या. त्या दोघींचे काहींनी अपहरण केले. 

बेळगाव पोलिसांनी त्या दोघींना दि. 1 डिसेंबर 2017 रोजी मिरज ते गोवा असा रेल्वेने प्रवास करताना ताब्यात घेतले होते. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्या मुलींना सदलगा पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी सलदगा पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला. 

त्या दोघीही मिरज रेल्वे स्थानकाजवळ थांबल्या होत्या. त्यानंतर त्यांना तोसीफ हंगड (रा. हंगड गल्ली, मिरज) याने येथील अक्षय हॉटेलमध्ये नेऊन त्यापैकी 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून हंगड याला अटक करण्यात आली. हा गुन्हा मिरज महात्मा गांधी चौकी पोलिसांच्या हद्दीत घडला असल्याने त्याचा पुढील तपास करण्यासाठी सदलगा पोलिसांकडून वर्ग करण्यात आला. तसे पत्र बेळगावचे पोलिस अधीक्षक यांनी सांगलीच्या पोलिस अधीक्षकांना दिले आहे. याबाबत रात्री पर्यंत महात्मा गांधी चौकी पोलिसांकडे याबाबत गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.