सांगली झेडपीचे जितेंद्र डुडी नवे 'सीईओ'

Last Updated: Jul 11 2020 8:44PM
Responsive image
जितेंद्र डुडी


सांगली : पुढारी ऑनलाईन

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावचे प्रकल्प अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी (मंचर उपविभाग पुणे) जितेंद्र डुडी यांची सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. जितेंद्र डुडी हे सन 2016 च्या बॅचचे आयएएएस अधिकारी आहेत. ते मूळचे राजस्थानमधील झुन्झूनुं या जिल्ह्यातील आहेत. स्वामी केशवानंद इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड ग्रामोथॉन जयपूर येथे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे.

वाचा : सांगली महापालिका क्षेत्र शतकाच्या उंबरठ्यावर

अभिजीत राऊत यांची दि. 18 जून रोजी जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त झाले होते. जिल्हा परिषदेचे कडक शिस्तीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार आहे. 

गुडेवार यांच्या बदलीसाठी हालचाली सुरू होत्या. बदलीसाठी काही आमदारांनी ग्रामविकास मंत्री यांना पत्रे दिलेली आहेत. गुडेवार यांच्या बदलीऐवजी सध्यातरी जिल्हा परिषदेत नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी हे रुजू होत आहेत. डुडी यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुडेवार हे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. गुडेवार यांची बदली होणार की लोकभावना मान्य करत त्यांना जिल्हा परिषदेत सेवा करण्याची संधी दिली जाणार याकडे लक्ष लागले आहे. 

वाचा :सांगली : दत्तात्रय पाटोळेंच्या खून प्रकरणातील पाच जणांना अटक