Wed, Aug 12, 2020 10:06होमपेज › Sangli › राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा 

माजी अर्थमंत्री जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष होणार ?

Published On: Apr 19 2018 1:37AM | Last Updated: Apr 19 2018 1:37AMइस्लामपूर : वार्ताहर

राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. महिना अखेरपर्यंत पक्षात नेतृत्व बदल अपेक्षित असून पक्ष नेतृत्वाची जबाबदारी आमदार पाटील यांच्यावर सोपविली जाण्याच्या शक्यतेने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आहे. 

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये नेतृत्वबदल केला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रदेशाध्यक्ष पदासाठी  जयंत पाटील यांच्याबरोबरच आमदार शशिकांत शिंदे, आमदार दिलीप वळसे-पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. 

गेल्या चार वर्षात सत्तेतून पायउतार झाल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे गटनेते म्हणून विधानसभेत आमदार पाटील यांची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. विविध प्रश्‍नांवर विधानसभेत आवाज उठवत त्यांनी विरोधकांची कणखर भूमिका पार पाडली आहे. शिवाय पक्षाचे मेळावे, संघर्ष यात्रा, हल्‍लाबोल यात्रेच्या निमित्ताने त्यांनी राज्यभर दौरे करीत पक्ष बांधणीसाठी प्रयत्न केले आहेत.  शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांनाही वाचा फोडली आहे. 

 सुसंस्कृत व अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या हल्‍लाबोल यात्रेचे नेतृत्वही जयंत पाटील यांनी केले. या यात्रेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. इस्लामपूर येथील हल्‍लाबोल यात्रेची सभाही राज्यात रेकॉर्ड ब्रेक सभा झाली. त्याची सर्वत्र चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही या गर्दीची दखल घेतली. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही  भाषणात उपस्थित कार्यकर्त्यांना ‘यापुढे जयंत पाटील यांना मतदारसंघात खिळवून ठेवू नका. राज्यातील पक्षाची धुरा त्यांना संभाळण्यासाठी वेळ द्या’, असे आवाहन करून एक प्रकारे नेतृत्व बदलाचे संकेतही दिले होते. आता पक्षाच्या प्रदेश प्रतिनिधींची महिनाअखेर बैठक होऊन  पक्षात नेतृत्व बदल केला जाणार आहे, असे समजते.