Wed, Aug 12, 2020 21:35होमपेज › Sangli › मुलाखती झाल्या; आता उमेदवारीचा खल

मुलाखती झाल्या; आता उमेदवारीचा खल

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 9:09PMसांगली : अमृत चौगुले

महापालिका निवडणुकीतील मुलाखतींचा टप्पा काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या प्रमुख पक्षांनी पार केला. शिवसेनेतर्फेही दोन दिवसांत मुलाखती होणार आहेत. परंतु यानंतर प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी उमेदवारीचा खल आता रंगणार आहे. त्यानंतर 4 ते 11 जुलैदरम्यान अर्जभरणा होणार आहे. अर्थात या जागावाटपावरच आघाडी-बिघाडी, युतीचे भवितव्य ठरणार आहे. शिवाय उमेदवारी डावलल्याने इकडून तिकडे  उमेदवारीचा खेळ रंगणार आहे. 

भावी 78 नगरसेवकांच्या जागांसाठी आणि बहुमतानुसार सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, जिल्हा सुधार समिती-आप, मनसे आदी पक्षाचे उमेदवार मैदानात उतरणार आहेत. परंतु यामध्ये प्रभागात स्थानिक उमेदवारांची ताकद आणि पक्षाची ताकद याचे समीकरण विजयाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने प्रत्येक पक्षाकडून गेल्या दोन महिन्यांपासून मोर्चेबांधणी सुरू होती. यामध्ये अनेक आजी-माजी नगरसेवकांनी प्रभागनिहाय सोयीनुसार भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या वाटा धरल्या. यातून आता सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी मांदियाळी जमली आहे. चार सदस्यांच्या 20 प्रभागांतून 78 जागांसाठी प्रत्येक प्रभागात प्रवर्गानुसार एकेका जागेसाठी डझनाहून अधिकजण इच्छुक आहेत. यानुसार काँग्रेस, भाजपच्या सांगली, मिरजेत शक्‍तिप्रदर्शनाने मुलाखती पार पडल्या. राष्ट्रवादीनेही सांगलीतच सर्व मुलाखती पार पडल्या. यानिमित्ताने आता ‘इलेक्शन माहोल’ निर्माण होऊ लागला आहे. 

केंद्र, राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला महापालिकेत यश मिळू देणार नाही असा इरादा करीत काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्धार केला आहे. वास्तविक विद्यमान नगरमंडळात  काँग्रेसच्या विरोधात  असलेल्या राष्ट्रवादीने यासाठी गेल्या चार महिन्यांपूर्वीच तसे संकेत दिले होते. खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी काँग्रेससमोर प्रस्ताव दिला. पण काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रभागनिहाय तुल्यबळ पाहिले तर अनेक प्रभागात अनेक इच्छुक उमेदवारांना संधी मिळणे कठीण आहे. दुसरीकडे काँग्रेसकडे विद्यमान सदस्यसंख्या आणि इच्छुक यामुळे जवळजवळ सर्वच प्रभागात अनेक प्रबळ दावेदार आहेत. 

इकडे राष्ट्रवादीकडेही तशीच अवस्था आहे. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याने राष्ट्रवादीला बळ मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडेही विद्यमान, प्रबळ  इच्छुक मोठ्या संख्येने आहेत. सोबतच काँग्रेसमधून अनेक नाराज नगरसेवक आले आहेत. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आता जागावाटपावरून मतभेद निर्माण होऊ लागले आहेत. त्यातूनही अनेक ठिकाणी समझोत्याने वाटप झाले तरी काही प्रभागांमध्ये तर तोडगा निघणेच अशक्य वाटते.

एकूणच यामुळे जागावाटपात कितपत समझोता होतो यावरच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे. एवढेच नव्हे तर आघाडी झालीच तर नाराजांची मोठी संख्या भाजप-शिवसेनेसह अन्य पक्षांकडे जाऊ शकते. यामुळे या नाराजी आणि बंडखोरीचा दोन्ही पक्षांना तोटा होऊ शकतो. यादृष्टीने नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनादरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींची चर्चा आणि जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. तरीही आघाडीचा निर्णय जेवढा लांबवून हा धोका टाळता येईल तेवढा टाळावा असा दोन्ही काँग्रेसचा सूर  आहे.

दुसरीकडे भाजप हा नवा पर्याय म्हणून पहिल्यांदाच थेट ताकदीने जनतेसमोर जात आहे. यामध्ये भाजपकडूनही केंद्र, राज्यातील सत्ता आणि आमदार, खासदारांचे बळ मिळणार, हे उघड आहे. त्यामुळे मूळ भाजपमधील  आणि अन्य पक्षांतून आलेल्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. अशा सांगली, मिरज आणि कुपवाडमधील सुमारे 300 हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. त्यातून जेथे प्रबळ उमेदवार आहेत अशांची दोन दिवसांत यादीही जाहीर करू, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. 

तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीतील उमेदवारी न मिळलेल्या नाराजांवर भाजपचा वॉच राहणार आहे. त्यांना उमेदवारीची कवाडे खुली आहेत हेही  जाहीर केले आहे. यामुळे अशा तळ्यात-मळ्यात असलेल्यांच्याही उमेदवारीवर भाजपची यादी ठरेल. त्यामुळे उमेदवारीच्या संधीतून चार दिवसांत पक्षांतराचे वारे वाहणार ते स्पष्ट आहे. दुसरीकडे रिपब्लिकन पक्ष, शिवसेना, मनसेसह अन्य समविचारी पक्षांनाही युतीसाठी दारे खुली आहेत असे भाजपने जाहीर केले आहे. परंतु अद्याप गांभीर्याने चर्चेस कोणीच पुढे आले नाही. एकूणच मुलाखतींचा अंक संपला तरी दुसर्‍या अंकात उमेदवारी ठरविताना इच्छुकांचे समाधान करावे लागणार आहे. यामध्ये सर्वांची सोय लावून प्रबळ उमेदवार मैदानात उतरविण्यासाठी पक्षनेत्यांचा कस लागणार आहे. 

प्रचारातही उमेदवारांची होणार कोंडी...!

काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढविण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामुळे दोघांनी एकमेकांची उणीधुणी काढायचे नाही, अशा पद्धतीने इच्छुकांचा प्रचार सुरू आहे. भाजपचीही मदार उघडपणे ऐनवेळी येणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादीतील उमेदवारांवर आहे. परिणामी भाजपनेही त्यादृष्टीने स्थानिक समस्यांवर टीका करणे टाळले आहे. आता आघाडी, युती आणि जे उमेदवार येतील त्यावरच प्रचाराची भूमिका ठरणार आहे. प्रसंगी यातून कोंडी होणार आहे.