Sun, Aug 09, 2020 11:26होमपेज › Sangli › पलूसला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान उभारणारमंत्री विश्‍वजित कदम

पलूसला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान उभारणारमंत्री विश्‍वजित कदम

Last Updated: Feb 19 2020 11:40PM
सावंतपूर : इकबाल मुल्ला
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या संकल्पनेतून पलूस येथील भारती विद्यापीठाच्या आवारात महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय मैदानाचीही उभारणी करण्यात येत आहे.त्यामुळे पलूससारख्या ग्रामीण भागातील युवकांना सरावासाठी मोठी संधी मिळणार आहे. 

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींना राष्ट्रीय क्रिकेट सामने व आयपीयल सामने पुणे, मुंबई, नागपूरला जाऊन पहावे लागत होते. काही दिवसांतरच ती सुविधा पलूस येथेच उपलब्ध होणार आहे. 

ग्रामीण भागातील मुले क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकायला हवीत, यासाठी डॉ. कदम यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. येथे रणजी सामन्याबरोबर आयपीयलचेही, डे- नाईट सामने होणार आहेत. नवोदित खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडू व कोच यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

पुणे, मुंबई, नागपूर शहरारानंतर महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी आंतरराष्ट्रीय मैदान नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आधुनिक व दर्जेदार अशा सोयी-सुविधा असलेले पहिलेच क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय स्टेडियम  येथे होत आहे. मैदानाचे काम जलदगतीने सुरू आहे. तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी लागणारी, अ दर्जाची खेळपट्टी, 70 यार्डची बॉन्ड्री, विद्युत प्रकाश झोतात सामना खेळण्याची सोय करण्यात येणार आहे. मैदानावर डे-नाईट क्रिकेट सामने खेळण्यासाठी पाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळपट्टया तयार करण्यात येत आहेत. सरावासाठी तीन स्वतंत्र खेळपट्ट्या तयार करण्यात येत आहे.  तसेच मंत्री  डॉ. विश्वजित कदम यांनी नागपूर येथे स्टेडियमच्या आराखड्याबाबत क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांची भेट घेऊन चर्चा केली. स्टेडियमच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रणही त्यांनी त्यांना दिले. दरम्यान, महाराष्ट्रामधील सर्वात मोठे स्टेडियम पलूस येथे साकारण्यात येत असल्याने क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलाच्या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी पलूससारख्या ग्रामीण भागात तयार करण्यात येत आहे. त्याचा फायदा ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना सरावासाठी तसेच पुढे मोठी संधी मिळावी या दृष्टीने पलूस येथे आधुनिक क्रिकेट स्टेडियम उभारले जात आहे. क्रिकेटप्रेमींना पुणे, मुंबई, नागपूर ऐवजी आंतरराष्ट्रीय सामने बघायला मिळणार आहेत.
 - डॉ. विश्‍वजित कदम