होमपेज › Sangli › पोलिसांवर दबावगट निर्माण करा 

पोलिसांवर दबावगट निर्माण करा 

Published On: Dec 01 2017 9:10AM | Last Updated: Nov 30 2017 11:41PM

बुकमार्क करा

इस्लामपूर : वार्ताहर

अनिकेत कोथळे खून प्रकरण व वारणा चोरी प्रकरणामुळे सांगली पोलिस दल बदनाम झाले हे मान्यच करावे लागेल. मात्र या  दोन्ही प्रकरणांचा धडा घेऊन यापुढे पोलिस चांगले काम करतील. त्याचबरोबर समाजाचा पोलिसांवर दबावगट असायला हवा. त्यामुळे पोलिसांकडून होणार्‍या चुकीच्या कामांना आळा बसेल, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केले.

आष्टा (ता. वाळवा) येथे नागरिकांशी ते संवाद साधत  होते. जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर जिल्हा पोलिस प्रमुख शशिकांत बोराटे ,पोलिस उपअधीक्षक किशोर काळे, पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे, नगराध्यक्षा स्नेहल माळी, माजी नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे आदी उपस्थित होते.  नागरिकांनी अनेक समस्या नांगरे-पाटील यांच्यासमोर मांडल्या.

विलासराव शिंदे यांनी आष्टा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी व एकेरी वाहतुुकीसाठी पोलिसांनी सहकार्य करण्याची मागणी केली. मंगलादेवी शिंदे यांनी आष्टा शहरात पोलिस चौकी उभारावी अशी सूचना मांडली. अनंतकुमार खोत यांनी शाळा, कॉलेज परिसरात टवाळखोरी करणार्‍यांचा पोलिसांनी बंदोबस्त करण्याची मागणी केली. वाढते ग्रुप व राजकीय पाठबळाने टोळी युद्धाची भीती निर्माण झाली आहेे. त्यामुळे याचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली.

समीर गायकवाड यांनी पोलिस ज्या तत्परतेने सामान्य नागरिकांवर कारवाई करतात तशीच कारवाई बड्यांवरही करावी, अशी मागणी केली. डॉ.प्रवीण वंजारी यांनी डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी केली. अनिल पाटील यांनी दत्तनगर परिसरात 20 हून अधिक चोर्‍या होऊनही त्यापैकी एकाही चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नसल्याचे सांगितले. पोलिस यंत्रणेतील काही भ्रष्ट लोकांमुळे चांगल्या पोलिसांचे  खच्चीकरण होत असल्याचे काही तरुणांनी  सांगितले.

नांगरे-पाटील यांनी या सर्व सूचनांची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले. ते म्हणाले, ज्यांचा आजपर्यंत पोलिसांपर्यंत आवाज पोहोचत नव्हता अशा सामान्य लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या संवाद कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यापुढे टवाळखोरीला पायबंद घातला जाईल. त्यामुळे आपल्या मुलांचे करिअर उद्ध्वस्त होऊ नये म्हणून पालकांनीच आपल्या मुलांना आवर घालावा.

पोलिस अधीक्षक शर्मा म्हणाले, यापुढे पोलिस सेवेलाच प्राधान्य दिले जाईल. नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन  कार्यवाही  केली जाईल. उपनगराध्यक्ष विशाल शिंदे, झुंजार पाटील, दिलीप वग्याणी, विराज शिंदे, प्रकाश रूकडे आदी उपस्थित होते.