Sun, Aug 09, 2020 11:31होमपेज › Sangli › प्रतिस्पर्ध्यांच्या ‘पारधी’साठी अपक्षांची ‘वाघर’!

प्रतिस्पर्ध्यांच्या ‘पारधी’साठी अपक्षांची ‘वाघर’!

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 8:45PMसांगली : सुनील कदम

महापालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमध्येे मोठ्या प्रमाणात बंडखोरांचे पीक फोफावले आहे. पण बंडखोरांच्या या समस्येलाच संधी समजून तीनही पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांला नामोहरम करण्यासाठी काही बंडखोरांचा खुबीने वापर करण्याची व्यूहरचना चालविल्याचे दिसून येत आहे. तीनही राजकीय पक्षांच्यावतीने लावण्यात आलेल्या या अपक्षांच्या ‘वाघरीत’ त्या त्या पक्षातील कोणकोणते मातब्बर सापडणाक ते लवकरच स्पष्ट होणार आहे.महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेवटपर्यंत आपल्या पक्षांमधील बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न केला. दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या होती. त्यामुळे सर्वांना संधी मिळावी यासाठी दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढावे, असा दोन्ही पक्षातील काही प्रमुख कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र स्वतंत्रपणे लढलो तर भाजपचा फायदा होण्याच्या भितीने दोन्ही पक्षातील नेत्यांनी आघाडीबाबत आणि जागा वाटपाबाबत शेवटपर्यंत या कानाचे त्या कानाला कळू दिले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या क्षणी निश्‍चित केलेल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यामुळे अनेक इच्छुकांना कुणाला उमेदवारी दिली आणि कुणाला डावलले हे समजू शकले नाही. 

या गोपनीयतेमुळे आपल्यातील बंडखोरीला आळा बसेल, त्याचप्रमाणे हे बंडखोर भाजपच्या गळाला लागणार नाहीत, असा दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा होरा होता, पण नेत्यांनी या चाली करण्यापूर्वीच अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज भरूनसुध्दा टाकले होते. म्हणजे बंडखोरी टाळण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न साफ फसला होता. मात्र आपले बंडखोर भाजपच्या गळाला लागणार नाहीत, याची दोन्ही पक्षांनी घेतलेली दक्षता मात्र कामी आली.

उमेदवारीच्या बाबतीत भाजपची व्यूहरचना वेगळीच होती. एकतर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार नाही, झाली तर जागा वाटपावरून त्यांच्यात रणकंदन माजून या दोन पक्षातील अनेक मातब्बर भाजपमध्ये डेरेदाखल होतील, असा भाजपच्या नेत्यांचा कयास होता. त्यामुळे या संभाव्य आयारामांच्या प्रतीक्षेत त्यांनीही शेवटपर्यंत आपली उमेदवार यादी जाहीर केली नव्हती. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेल्या चालीमुळे भाजपची ही प्रतीक्षा फोल ठरली आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आयारामांचे पीक काही फोफावलेच नाही. 

भाजपमधील अनेक निष्ठावंतांचा आयारामांना उमेदवारी देण्यास विरोध होता, मात्र हा विरोध दुर्लक्षित करून भाजपनेही काही प्रमाणात कालपरवा पक्षात दाखल झालेल्यांना उमेदवारी बहाल करून टाकली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीइतके नसले तरी त्रासदायक ठरेल इतक्या प्रमाणात भाजपमध्येही बंडखोरीचे तण माजलेले दिसतच  आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि शहर सुधार समितीच्या एकूण उमेदवारांची संख्या ही 227 आहे, तर सर्वपक्षीय अपक्षांची संख्या  224 आहे. याचा अर्थ जवळपास प्रत्येक पक्षीय उमेदवारांपुढे त्यांच्या त्यांच्या पक्षातील किंवा अन्य पक्षातील बंडखोरांचे आव्हान उभे आहे.  काँग्रेस, 

अर्थकारणाचे ‘इप्सित’

‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने आपापल्या राजकीय फायद्यासाठी अपक्षांचा वापर करून घेण्याची व्यूहरचना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांनी  सुरुवातीपासूनच केल्याचे दिसते. काही अपक्षांना आपापल्या राजकीय कुवतीचा चांगलाच अंदाज होता, त्याचप्रमाणे निवडणुकीच्या मैदानात शिरून काही प्रमाणात ‘अर्थकारण’ साधण्यासाठीही काही मंडळी अपक्ष म्हणून मैदानात उतरलेली दिसत होती. निवडणूक अर्ज माघार घेण्याच्या कालावधीत यापैकी काहीजणांनी आपापले ‘इप्सित’ साध्य झाल्यावर माघारही घेतली. पण आपणाला राजकीयदृष्ट्या फायद्याच्या ठरणार्‍या काही अपक्षांनी माघार घेऊ नये म्हणून तीनही पक्षाच्या नेत्यांनी चांगलेच प्रयत्न केल्याचे दिसते. त्याचा परिणाम म्हणूनच या निवडणुकीत अपक्षांची संख्या बेसुमार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.