होमपेज › Sangli › राज्यात कौशल्य विद्यापीठ सुरू करणार : चंद्रकांत पाटील

राज्यात कौशल्य विद्यापीठ सुरू करणार : चंद्रकांत पाटील

Published On: Aug 05 2018 1:33AM | Last Updated: Aug 04 2018 10:34PMसांगली : प्रतिनिधी

आर्टिफिशिअल इंटिलिजन्सच्या प्रगतीमुळे प्रचंड बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे केवळ आरक्षण देऊन प्रश्‍न सुटणार नाही, तर नोकर्‍या देणारी महाविद्यालये निर्माण केली पाहिजेत. त्यासाठी आम्ही राज्यात कौशल्य विद्यापीठे निर्माण करीत असल्याची माहिती महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विलिंग्डन महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष विकास काकतकर होते. मंत्री पाटील पुढे म्हणाले, सध्या आर्टिफिशिअल इंटिलिजन्समध्ये प्रगती होत आहे. त्यामुळे अनेकांच्या नोकर्‍या धोक्यात आलेल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारीमध्येही वाढ होत आहे. या सर्वांचा विचार करून यापुढे महाविद्यालयांना केवळ आर्टस्, कॉमर्स, सायन्स ही पारंपरिक शिक्षण पद्धती बदलावी लागेल.

त्याच्याऐवजी नोकर्‍या देणारी, कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धती सुरू करावी लागेल. सध्या आरक्षणाची मागणी होत आहे. त्यांना आम्ही आरक्षण देऊ, तो त्यांचा हक्क आहे. परंतु केवळ आरक्षणाने शिक्षणाचे प्रश्‍न सुटणार नाही. नोकर्‍या देणार्‍या शिक्षण व्यवस्थेची निर्मिती करावी लागेल. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रात सहा कौशल्य विकासाची विद्यापीठे स्थापन करीत आहोत. याची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यात केलेली आहे. त्याठिकाणी त्यांना गरज असलेली वनाची शेती करण्यासाठी प्रशिक्षण देणारे विद्यापीठ सुरू केले. सांगली जिल्ह्यातही अशा पद्धतीने विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यासाठी संस्थांनी पुढाकार घेतल्यास त्यांना तात्काळ ते मंजूर केले जाईल. 

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, गुणवत्तेचे संदर्भ बदलत आहेत. पारंपरिक शिक्षणातून नोकरी मिळणार नाही. त्याला कौशल्य, संशोधन आणि व्यवस्थापनाची जोड द्यावी लागणार आहे. देशासाठी उत्तम नागरिक करण्यासाठी महाविद्यालयांनी प्रयत्न केले पाहिजे. 

आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, सांगलीत अनेक महाविद्यालयातून दर्जेदार शिक्षण मिळत आहे. त्यामुळे सांगलीला एज्युकेशन हब निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू. खासदार संजय पाटील म्हणाले, सध्या शिक्षणाचे बाजारीकरण झालेले आहे. नोकर्‍या लावताना पैसे घेतले जाते. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही. शासनाने शिक्षणातील बाजारीकरण रोखण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, असे ते म्हणाले. 

प्राचार्य भास्कर ताम्हनकर यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष किशोर पंडीत यांनी स्वागत केले. कनिष्ठ महाविद्यालय समितीचे अध्यक्ष सागर फडके यांनी परिचय करून दिला. संस्थेचे कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांनी संस्थेविषयी माहिती दिली. प्रा. आर. जे. पाटील यांनी आभार मानले. यावेळी दीपक शिंदे-म्हैसाळकर, शेखर इनामदार आदी उपस्थित होते.