Wed, Aug 12, 2020 10:08होमपेज › Sangli › जयंत पाटील यांना घरी बसवू : चंद्रकांतदादा पाटील

जयंत पाटील यांना घरी बसवू : चंद्रकांतदादा पाटील

Published On: Jun 25 2019 1:37AM | Last Updated: Jun 25 2019 1:37AM
कवठेपिरान : वार्ताहर 

विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघात समोरचा  विरोधक कितीही बलाढ्य असला तरी त्याला याखेपेस घरी बसवू, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांचे नाव न घेता दिला. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनाही बारामतीत   पिंगा घालायला लावला, असा  टोलाही त्यांनी लगावला.  

कवठेपिरान (ता. मिरज) येथे नळपाणी पुरवठा योजना,  पूरसंरक्षक घाटाच्या भिंत कामांचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर झालेल्या सभेत  ते बोलत होते.  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धैयशील माने, आमदार सुधीर गाडगीळ, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील,  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, शेखर इनामदार, युवानेते गौरव नायकवडी, राहुल महाडिक   उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव माने यांच्यासह सहकार्‍यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.  

मंत्री पाटील  म्हणाले, मिरज पश्‍चिम भागातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करू. त्यात हयगय होणार नाही. भीमराव माने यांना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही  निधीची चिंता करू नका, तुम्ही मागाल त्यापेक्षा जादा निधी या भागासाठी देऊ. सार्‍या भागाचा कायापालट करू. ते  म्हणाले, इस्लामपूर विधानसभा  मतदारसंघात समोरचे आव्हान लक्षात घेऊन सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. अजून विधानसभा  निवडणूक दूर आहे. सर्वांनी एकत्र बसून उमेदवार ठरवा  आणि एकदिलाने काम करा. विरोधकांना घरी बसवू.  
   

भीमराव माने म्हणाले, आम्हाला निवडणुकीत उमेदवारी नको अथवा कोणत्याही महामंडळाचे अध्यक्षपद नको आहे. पण फक्‍त मिरज पश्‍चिम भागात गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय कुरघोडीतून रखडलेल्या विकासाला गती देण्यासाठी बळ द्या.

हिंदकेसरी मारुती माने यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण  

यावेळी हिंदकेसरी मारुती माने विकास सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सोसायटीच्या आवारात हिंदकेसरी  माने यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. त्या पुतळ्याचे मंत्री पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी मंत्री पाटील यांनी (कै.) भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मिरज पश्‍चिम भागातील  विविध गावांचे सरपंच, उपसरपंच ग्रामस्थांच्या   वतीने  मंत्री पाटील, खासदार  माने यांचा सत्कार करण्यात आला.सरपंच  श्रीमती सोनाताई गायकवाड, उपसरपंच प्रताप भोसले, माजी उपसरपंच सागर पाटील, दुधगावचे सरपंच विकास कदम, अर्जुन माने, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.