Mon, Aug 10, 2020 04:39होमपेज › Sangli › राज्यातील 900 रेशन दुकानदारांना दणका

राज्यातील 900 रेशन दुकानदारांना दणका

Last Updated: Jun 09 2020 10:38PM
सांगली  : शशिकांत शिंदे

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून रेशनिंगद्वारे लोकांना मोठ्या प्रमाणात धान्य वाटप सुरू आहे. गेल्या अडीच महिन्यांच्या काळात धान्य वाटप करताना राज्यातील सुमारे 900 रेशन दुकानदारांनी गोलमाल केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे   राज्यातील 485 रेशन दुकानांचे निलंबन, 322 रेशन दुकानांचे परवाने रद्द  तर राज्यातील 93 रास्तभाव दुकानदारांची 100 टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे.

कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर मार्चमध्ये  अचानक लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला.     राज्यातील एकही नागरिक उपाशी  राहता कामा नये, यासाठी सरकारने मुबलक धान्य पुरवठा सुरू केला. राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागावर वितरण करण्याची   जबाबदारी दिली आहे.   

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय योजनेअंतर्गत ग्रामीण भागात 44 हजार व शहरी भागात 59 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍या कुटुंबांना प्रतिकिलो  दोन रुपयेप्रमाणे गहू व तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ देण्यात येतो. कोरोनाचे संकट सुरू असल्याने मजूर आणि  गोरगरीबांच्या पोटाचे  हाल सुरू  आहेत. त्यामुळे शासनाने अशा लोकांसाठी रेशनवर धान्य मोफत उपलब्ध करुन दिले आहे. शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ दिला. याबरोबरच केशरी कार्डधारकांनाही कमी भावात गहू व तांदूळ दिला जात आहे. पांढर्‍या कार्डधारकांना व कार्ड नसलेल्यांना धान्य देण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात हजारो टन धान्य वाटप करण्यात आले आहे.  

  धान्य वाटप करताना अनेक ठिकाणी   काही गैरप्रकार पुढे आले.  अनेक गावात रेशन दुकानांबद्दल तक्रारी करण्यात आल्या. दुकानात रजिस्टर अद्यावत नसणे, लाभार्थ्यांना धान्य कमी देणे, जे लाभार्थी धान्य घेेत नाहीत त्यांचे धान्य  जादा दराने दुसर्‍यांना विकणे अशा तक्रारी करण्यात आल्या. स्वस्त धान्य दुकानात बायोमेट्रिक वितरण प्रणाली राबविण्यात आली. मात्र यातूनही काही दुकानदार पळवाटा शोधून काढत आहेत. अनेकवेळा या प्रणालीमध्ये बिघाड आहे, लाभार्थ्यांचे अंगठ्याचे ठसे जुळत नाहीत  असे सांगून धान्य देण्यास टाळाटाळ केली. अनेक दुकानदार पावतीच देत नाहीत.  

दुकान सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत पूर्ण वेळ सुरू ठेवणे बंधनकारक आहे. मात्र   अनेक ठिकाणी दुकानदार मनात येईल तेव्हा दुकाने सुरू अथवा बंद ठेवत असल्याच्या तक्रारी आहेत. यातून काही रेशन दुकानदार मालामाल झाले आहेत. यासाठी संबधित विभागातील काही कर्मचारी व अधिकारी यांना हाताशी धरले जात आहे, अशा अनेक तक्रारी स्थानिक प्रशासन तसेच  राज्य सरकारकडे  करण्यात आल्या.

राज्यात सुमारे 52 हजार रेशन दुकाने आहेत. त्यापैकी  483 रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. त्याशिवाय  322 रेशन दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले तर राज्यातील 93 रास्त भाव दुकानदारांची 100 टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे.  काळाबाजार, वाटप करतांना कमी धान्य देणे किंवा जास्त पैसे घेणे तसेच नियमांचे पालन न करणे या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.