Thu, Jul 02, 2020 18:38होमपेज › Sangli › हायव्होल्टेज प्रचार समाप्‍त; उद्या मतदान

हायव्होल्टेज प्रचार समाप्‍त; उद्या मतदान

Published On: Apr 22 2019 1:35AM | Last Updated: Apr 22 2019 1:35AM
सांगली : प्रतिनिधी

सांगली आणि हातकणंगले  लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (दि. 23) सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत अटीतटीने, ईर्ष्येने मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या महिनाभरापासून निवडणुकीच्या हायव्होल्टेज प्रचाराची रविवारी सायंकाळी सांगता झाली. मतदारांना स्लिप वाटण्यात आल्या आहेत. स्लिप न वाटणार्‍या कर्मचार्‍यांवर करवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

ते म्हणाले, सांगली लोकसभेसाठी 18 लाख 3 हजार 54 मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार 9 लाख 29 हजार 232 तर स्त्री मतदार 8 लाख 73 हजार 749 आणि तृतीयपंथी 73 आहेत. एक हजार 39 इमारतीत 1 हजार 848 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी 25 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. टपाली मतदान 18 हजार 382 असून, त्यात सैनिक मतदार 6 हजार 55 आणि कर्मचारी, अधिकारी यांचे 12 हजार 327 मतदार आहेत. मतदानासाठी 11 हजार 339 कर्मचारी, अधिकारी आहेत. जिल्ह्यातील 1 लाख 25 हजार 245 नव मतदारांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले आहे. त्याशिवाय  16 लाख 79 हजार 714 मतदारांना मतदान स्लिप देण्यात आल्या  आहेत. ज्या कर्मचार्‍यांनी मतदान ओळखपत्र किंवा स्लिप वाटप न करता त्यांच्याकडेच ठेवले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. संपूर्ण महिला कर्मचारी असलेली 6 तर आदर्श केंद्र 8 आहेत. मतदान मशीन वाटप करणार्‍या वाहनांना जीपीएस प्रणाली जोडली आहे. 

ते म्हणाले, सी व्हिजिल अ‍ॅपवर 54 तक्रारी आल्या. त्यात 27 तक्रारीचे 100 मिनिटात निराकरण करुन बाकी संबंध नसलेल्या 27 तक्रारी काढून टाकल्या आहेत. 1950 या टोल फ्री क्रमांकावर 2 हजार 656 लोकांशी संपर्क साधला. मतदान केंद्रात मतदारांना मोबाईल घेऊन जाता येणार नाही. मंगळवारचे आठवडे बाजार पुढे ढकलून सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 

निवडणूक आयोगाने मतदानासाठी 11 पैकी एक ओळखपत्र आवश्यक केले आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला यांना मतदानासाठी प्रशासनातर्फे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांच्या मदतीसाठी मतदान केंद्रावर स्वयंसेवक ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 10 टक्के म्हणजे 184 मतदान केंद्रावर वेब कास्टींग करण्यात येणार आहे. मतदानासाठी 314 वाहनांची व्यवस्था केली आहे. आतापर्यंत 29 लाख रुपयाचा बेकायदा दारूसाठा जप्त केला.