Sun, Aug 09, 2020 01:45होमपेज › Sangli › वीज अपघातग्रस्‍त कुटुंबास आर्थिक मदतीचा हात

वीज अपघातग्रस्‍त कुटुंबास आर्थिक मदतीचा हात

Published On: Jun 27 2019 3:22PM | Last Updated: Jun 27 2019 2:25PM

जत : करजगी ता. जत येथील  विजेच्या अपघात महादेव  हाजगी यांचे निधन झाले. त्यांच्या  कुटुंबास  माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी भेट देऊन विचारपूस केली व आर्थिक आधार दिला.  जत : शहर प्रतिनिधी

करजगी (ता. जत) येथे विद्युत तार तुटून जमिनीवर पडली होती. याच तारेस मेंढीचा स्पर्श झाल्याने ती तडफडू लागली. मुक्या जनावरास वाचविण्याच्या प्रयत्नात महादेव साबू हाजगी (वय-४८) यांचा विजेच्या तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. कुटुंबातील कर्त्या माणसाच्या निधनाने हाजगी कुटुंब उघड्यावर पडले आहे. महावितरणाच्या या अनागोंदी कारभारामुळे नाहक बळी गेला असल्याचा आरोप करण्यात आला. या कुटुंबाची सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी भेट देऊन सांत्वन केले. आर्थिक आधार व मदत केली. तसेच आमदार विलासराव जगताप व खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून शासकीय मदत मिळवून देण्याची यावेळी ग्वाही दिली. 

 यावेळी करजगी सर्व सेवा सोसायटीचे अध्यक्ष रेवाप्पा पट्टणशेट्टी, सत्तार जाहागिरदार, माडग्याळचे युवा नेते शिवानंद हाक्के व शेतकरी उपस्थित होते.

याबाबत माहिती अशी की, करजगी (ता. जत) येथे विज वितरण कंपनीच्या तुटून खाली पडलेल्या आर्थिंक तारेतून अचानक रिटर्न विद्यूत प्रवाह सुरू झाला. दरम्यान शेतात मेंढ्या चारत असणाऱ्या महादेव हाजगी या मेंढपाळाची एक मेंढी वीज वितरण कंपनीच्य तारेला चिकटली असता तिला वाचविण्यासाठी महादेव गेले असता त्यांनाही विजेचा धक्का लागून ते जागीच ठार झाले. ही तार  अनेक दिवसांपासून खाली पडून होती. या तारेत विद्यूत प्रवाह नसतो मात्र गुरूवारी अचानक या तारेतून रिटर्न विद्यूत प्रवाह आल्याने ही दुर्देवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच गावातील लोक एकत्रित झाले. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी प्रवीण फडतरे व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी आले. 
             
यापूर्वी करजगी येथे विज वितरणाच्या लोंबकळणाऱ्या तारांतून ठिणग्या पडून फळबागा, उसशेतीला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. वीज वितरण कंपनीने लोंबकळणाऱ्या,जमिनीवर पडलेल्या तारांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी वारंवार असताना महावितरण यापुढे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे अशा प्रकारच्या तालुक्यात अनेक घटना महावितरणच्या हलगर्जीपणामुळे घडल्या असल्याचा आरोप जमदाडे यांनी केला