होमपेज › Sangli › वाळू तस्कराकडून तलाठ्यास मारहाण

वाळू तस्कराकडून तलाठ्यास मारहाण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मिरज : प्रतिनिधी

मिरज-पंढरपूर रस्त्यावर कळंबीजवळ पकडण्यात आलेला वाळूचा ट्रक तलाठ्यास जीवे मारण्याची धमकी देत मारहाण  करून  पळवून नेण्याचा चौघांनी प्रयत्न केला. या प्रकाराच्या निषेधार्थ तहसील कार्यालय व तलाठी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

तहसीलदार शरद पाटील, नायब तहसीलदार शेखर परब यांच्या पथकाने कळंबीजवळ नंबरप्लेट नसलेला वाळूचा ट्रक बुधवारी सकाळी पकडला. हा ट्रक तहसील कार्यालयाकडे नेण्यासाठी मल्लेवाडीचे तलाठी पोपट ओमासे यांना पाठवले. परंतु, कळंबीपासून थोडे अंतर पुढे आल्यावर ट्रकच्या पाठोपाठ येत असलेल्या व क्रमांक नसलेल्या इनोव्हा गाडीतील चौघांनी ट्रक अडवला. तलाठी ओमासे यांना धक्काबुक्की  आणि  मारहाण केली. त्यांचा मोबाईल काढून घेतला. त्यांना ट्रकमधून बाहेर फेकण्यात आले. या प्रकारानंतर  ट्रक पुन्हा पंढरपूरच्या दिशेने नेण्यात आला.

पाठोपाठ येणार्‍या तहसीलदारांच्या पथकाला हा प्रकार समजला. यांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला. सिद्धेवाडी खणीजवळ तो  ट्रक पकडण्यात आला. मात्र ट्रक पळवून नेणारे चौघेजण  इनोव्हा गाडीतून पसार झाले. संशयितांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ तलाठी संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले आहे. तलाठ्यास मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देणार्‍यांविरुद्ध कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा तलाठी संघटनेने दिला आहे.

वाळूचा ट्रक पकडण्याच्या कारवाईमध्ये बेडगचे तलाठी प्रवीण जाधव, म्हैसाळचे तलाठी बाबासाहेब बनसोडे, बेळंकीचे तलाठी शिवाजी नरुटे व महसूल अव्वल कारकून संजय संकपाळ यांनी भाग घेतला होता. 

पकडण्यात आलेल्या वाळूच्या ट्रक नंबर प्लेट नव्हती.  परंतु गाडीमध्ये मिळालेल्या कागदपत्रांवरुन या ट्रकचा क्रमांक एम. एच. 50- 4875 असा आहे. ट्रक पळवून नेणारे व ट्रक मालक यांचा अद्याप सुगावा लागलेला नाही. बेकायदा वाळू वाहतुकीविरुद्ध कठोर कारवाईची  भूमिका घेतली जाईल अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली.