Wed, Aug 12, 2020 08:43होमपेज › Sangli › अखेर महापौर शिकलगार यांचा अर्ज पात्र

अखेर महापौर शिकलगार यांचा अर्ज पात्र

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 12 2018 11:58PMसांगली : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे महापौर हारुण शिकलगार यांच्या प्रभाग 16 मधील उमेदवारीला तिसर्‍या अपत्याच्या मुद्द्यावर हरकत घेण्यात आली होती. गुरुवारी अर्ज छाननीदरम्यान सामाजिक कार्यकर्ते आसिफ बावा यांनी ही हरकत घेतली होती. त्याबद्दल निवडणूक अधिकारी तुषार ठोंबरे यांच्यापुढे तब्बल चार तास सुनावणी झाली.  ठोंबरे यांनी दोन्ही बाजू ऐकून कायदेशीर अभिप्राय घेत शिकलगार यांचा अर्ज पात्र ठरविला. अन्य उमेदवारी अर्जांवरही अनेक प्रकारच्या हरकती घेतल्या गेल्या. त्यामुळे महापालिकेसमोर तणावाचे वातावरण होते. निवडणुकीसाठी महापौर शिकलगार यांच्यासह तब्बल 869 जणांचे 1128 अर्ज दाखल झाले होते. त्या अर्जांची आज छाननी आणि  हरकतींवर सुनावणी झाली. यापैकी महापौर शिकलगार यांच्या उमेदवारीबद्दलच्या हरकतीकडे तीनही शहरांचे लक्ष होते. 

या सुनावणीच्या वेळी  दोन्ही पक्षांचे समर्थकही महापालिकेसमोर सकाळी 10 वाजल्यापासून मोठ्या संख्येने जमा झाले होते. दुपारी अडीचच्या सुमारास  सुनावणी सुरू झाली. बावा यांनी श्री. शिकलगार यांना 2008 मध्ये तिसरे अपत्य झाल्याची हरकत घेतली. याबाबत वसंतदादा शासकीय रुग्णालयाकडून त्यांच्या नावे मुलीचा जन्म झाल्याची महापालिकेकडे नोंद झाल्याचा दावा करीत कागदपत्रे सादर केली. 

महापालिकेत मुलीऐवजी मुलगा अशी नोंद जन्म-मृत्यू कार्यालयात झाल्याचे लक्षात आल्यानंतर 2009 मध्ये त्यामध्ये दुरुस्ती करून मुलगी असे करण्यात आल्याचा दावाही बावा यांनी केला. सन 2017 मध्ये हे प्रकरण अंगलट येत असल्याने श्री. शिकलगार यांनी महापौरपदाच्या अधिकाराचा गैरवापर करीत नोंदीत दुरुस्ती करून आपले नाव खाडाखोड करून काढल्याचाही आरोप  केला. यामुळे त्यांचा अर्ज अपात्र ठरवावा, अशी मागणी  बावा यांनी केली.

श्री. शिकलगार यांच्याबाजूने अ‍ॅड. राजू नरवाडकर आणि अ‍ॅड. मुमताज जमादार यांनी बाजू मांडली. त्यांनी शिकलगार यांच्याबाबतचे आक्षेप फेटाळून लावले. बावा यांनी दिलेले पुरावे खोटे असल्याचा दावा केला. ज्या अपत्याबाबत बावा यांनी दावा केला आहे त्याच्याशी आणि संबंधित महिलेशी शिकलगार यांचा काहीच संबंध नसल्याचा दावा करीत त्याचे पुरावे सादर केले. यामध्ये संबंधित महिलेने चुकीचे नाव नोंदविल्याबद्दल प्रतिज्ञापत्राद्वारे महापालिकेतील जन्म-मृत्यू कार्यालयाकडे तक्रार केल्याचे पुरावे सादर केले. त्यानुसार नोंदीत  दुरुस्ती झाल्याची बाजू मांडली. यामुळे या प्रकरणात श्री. शिकलगार यांचा  संबंध काय, असाही प्रश्‍न केला.

सुनावणीच्या वेळी दोन्ही बाजूंनी  उलट-सुलट आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.  श्री. ठोंबरे यांनी साडेसहापर्यंत निकाल राखून ठेवला.  निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी, कायदेशीर सल्लागार यांच्याकडून अभिप्राय मागवून घेतला. त्यानुसार श्री. बावा यांचा अर्ज त्यांनी फेटाळला आणि शिकलगार यांचा अर्ज पात्र ठरविला.  बावा म्हणाले, निवडणूक अधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.या सुनावणीदरम्यान कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुनावणीदरम्यान, नगरसेवक राजेश नाईक, मयूरशेठ पाटील, उमर गवंडी, इरफान शिकलगार यांच्यासह दोन्ही बाजूंचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.